Satara Crime: दहिवडीत चोरट्यांनी अख्खं किराणा दुकान लुटलं, सीसीटीव्हीसह मेमरीकार्डही लंपास केलं
By दत्ता यादव | Published: March 16, 2023 07:29 PM2023-03-16T19:29:15+5:302023-03-16T19:30:31+5:30
माल चोरून नेण्यासाठी चोरट्यांनी चारचाकी आणली होती
सातारा : दुकानातील एक-दोन वस्तू चोरीस गेल्याचे आजपर्यंत आपण ऐकलं असेल. मात्र, अख्खं दुकान कधी चोरीला गेल्याचे ऐकले आहे का, असाच काहीसा प्रकार दहिवडीमध्ये घडलाय. चोरट्यांनी चक्क अख्खं दुकानच लुटून नेलंय. तेल डब्यापासून अगदी मसाल्याच्या पुड्यापर्यंतच्या साऱ्या वस्तू दुकानातून गायब करण्यात आल्या आहेत. एकूण पाच लाखांचा माल चोरट्यांनी हातोहात लांबविला आहे. ही घटना दि. १४ रोजी रात्री मध्यरात्री घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, स्वागत महावीर दोशी (वय २७, रा. स्वामी समर्थ मंदिराच्या शेजारी, दहिवडी, ता. माण) यांचे दहिवडी येथे किराणा मालाचे दुकान आहे. मंगळवार, दि. १४ रोजी रात्री साडेदहा वाजता नेहमीप्रमाणे त्यांनी आपले दुकान बंद केले. दरम्यान, चोरट्यांनी मध्यरात्री दुकानाच्या पाठीमागील पत्रा उचकटून आतमध्ये प्रवेश केला. दुकानातील तेलाचे ४५ पत्र्याचे डबे, साबुदाण्याची ५० किलोची ३ पोती, खोबऱ्याच्या १५ किलोच्या १३ पिशव्या, पाच किलो मसाल्याचा एक बाॅक्स, ६० किलो वजनाच्या बदामाच्या २ पिशव्या, २० किलो वजनाच्या काजूच्या दोन पिशव्या, १० किलो साधे मणुके एकबाॅक्स, २० किलो जीऱ्याचे प्रत्येकी १ किलोच्या २० पिशव्या, ३० किलो तूरडाळ, ३० किलो मूगडाळ, पारले बिस्किटाचे ५ बाॅक्स, साबणाचा एक बाॅक्स, चहा पावडर, ११ किलो खारीक, २७ किलो मिरे, १० किलो बादलफूल असा तब्बल पाच लाखांचा मुद्देमाल लंपास केला.
दुकान मालक स्वागत दोशी हे सकाळी दुकान उघडण्यास आले असता चोरीचा हा प्रकार निदर्शनास आला. यानंतर दहिवडी पोलिसांना याची माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. याबाबत अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक गुलाब दोलताडे हे करीत आहेत.
मेमरी कार्डसह सीसीटीव्हीही गायब
चोरट्यांनी दुकानातील दोन सीसीटीव्हीसह त्याचे मेमरीकार्डही चोरून नेले. जेणेकरून पाठीमागे पुरावे राहू नये, याची चोरट्यांनी पुरेपूर काळजी घेतली. पाळत ठेवूनच चोरट्यांनी दुकानावर डल्ला मारला असावा, असे पोलिसांचे म्हणणे आहे.
माल नेण्यासाठी चारचाकी...
दुकानातून किराणा माल चोरून नेण्यासाठी चोरट्यांनी चारचाकी आणली होती. मात्र, ते वाहन कोणते होते, हे अद्याप पोलिसांना समजले नाही. दहिवडीतील अन्य ठिकाणावरील सीसीटीव्ही तपासण्याचे काम पोलिसांनी हाती घेतले आहे. चोरट्यांच्या तपासाठी पोलिसांनी दोन पथके तयार केली असून, ही पथके विविध ठिकाणी रवाना झाली आहेत.