Satara News: बंद फ्लॅट फोडून चोरट्यांनी पाच लाखांचा ऐवज केला लंपास, कोयना वसाहतीतील घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2022 01:35 PM2022-12-28T13:35:39+5:302022-12-28T13:36:10+5:30
आगाशिवनगर, मलकापूरसह कोयनावसाहत परिसरात चोरीच्या घटनामध्ये वाढ
माणिक डोंगरे
मलकापूरः कोयनावसाहत येथील दोन अपार्टमेंट मधील तीन बंद फ्लॅट फोडून चोरट्यांनी सुमारे पाच लाखाचा ऐवज लंपास केला. यात १० तोळे सोन्याच्या दागिन्यांसह इतर साहित्यावर चोरट्यांनी डल्ला मारला. कोयनावसाहत ता. कराड येथील रायगड या अपार्टमेंटमध्ये काल, मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडलेली ही घटना आज बुधवारी सकाळी उघडकीस आली. याप्रकरणी अमीत महापूरे यांनी शहर पोलिसात तक्रार दिली आहे.
घटनास्थळावरुन व पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, कोयनावसाहत येथील पाचमंदिर परिसरात राजगड अपार्टमेंट आहे. या अपार्टमेंटमध्ये अमित महापूरे हे काही वर्षांपासून कुटूंबासह राहतात. मंगळवारी ते कुटुंबासमवेत कोल्हापूरला गेले होते. दरम्यान चोरट्यानी बंद फ्लॅटचा कोयडा तोडून चोरट्याने आत प्रवेश करत सुमारे नऊ ते दहा तोळे सोन्यावर डल्ला मारला. नंतर शेजारील बिल्डिंगमध्येही दोन फ्लॅट फोडले. मात्र त्या ठिकाणी कुणीच राहत नसल्याने चोरट्यांच्या हाती काहीच लागले नाही.
घटनेची माहिती मिळताच कराड शहर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक आर. एस. पवार, हवालदार संजय जाधव यांच्यासह कर्मचारी घटनास्थळी दाखल होत पाहणी केली. घटनेची नोंद कराड शहर पोलिस ठाण्यात झाली आहे.
चोरट्यांचा धुमाकूळ
आगाशिवनगर, मलकापूरसह कोयनावसाहत परिसरात चोरीच्या घटनामध्ये वाढ झाली आहे. अशातच काल, मंगळवारी कोयनावसाहतमध्ये चोरट्यांनी तीन फ्लॅट फोडले. त्यामुळे बंद घर फोडण्याचे सत्र सुरुच आहे.
नागरिकांचे दुर्लक्ष, पोलिसांची चालढकल
लहान लहान चोरीच्या घटनामध्ये पोलिसांचा ससेमीरा नको म्हणून नागरिक तक्रार नोंदवत नाहीत. अनेक घटनांमधील चोरीचे तपासाचे पुढे काय झाले त्याचा पत्ता नाही. चोरीच्या घटनांबाबत पोलिस चालढकल करत असल्याची नागरिकांमध्ये चर्चा आहे.