उकाड्यामुळे रात्री झोपताना दरवाजा उघडा ठेवणं दाम्पत्याला पडलं महागात, भुईंज येथील घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2022 04:44 PM2022-05-04T16:44:23+5:302022-05-04T16:44:41+5:30
सातारा : सध्या उकाड्यामुळे सर्वचजण हैराण झाले आहेत. त्यामुळे रात्री झोपताना दरवाजातून हवा आतमध्ये यावी, यासाठी अनेकजण दरवाजा उघडा ...
सातारा : सध्या उकाड्यामुळे सर्वचजण हैराण झाले आहेत. त्यामुळे रात्री झोपताना दरवाजातून हवा आतमध्ये यावी, यासाठी अनेकजण दरवाजा उघडा ठेवत आहेत. मात्र, हीच संधी साधून चोरटे आपला डाव साधत आहेत. असाच काहीसा प्रकार भुईंजमधील मालदेववाडी येथे घडला असून, चार चोरट्यांनी घरातील पैसे आणि दागिने चोरून नेले. मात्र, झोपेत असलेल्या दाम्पत्याला याचा कसलाच थांगपत्ता लागला नाही.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, भुईंज येथील मालदेववाडी येथे विठ्ठल लक्ष्मण मोरे (वय ७५) आणि त्यांची पत्नी वास्तव्यास आहेत. मंगळवारी रात्री या दाम्पत्याने झोपताना मुख्य दरवाजा उघडा ठेवला होता. तर सेफ्टी दरवाजा आतून कडी घालून बंद केला होता. मात्र, चोरट्यांनी सेफ्टी दरवाजातून हात घालून अलगद कडी काढली. त्यानंतर दबक्या पावलाने साऱ्या घरात फिरून कपाट, डबे चोरट्यांनी उचकटले. एवढेच नव्हे तर वृद्धेने उशाला गळ्यातील मंगळसूत्र काढून ठेवली होते. तेही चोरट्यांच्या हाती लागली. चोरटे घरबर फिरले. तरी सुद्धा गाढ झोपेत असलेल्या दाम्पत्याला कसलीही चाहूल लागली नाही.
सकाळी जेव्हा जाग आली. तेव्हा त्यांच्या पायाखालची वाळू सरकली. घरातील पैसे आणि दागिणे असा सुमारे ४० हजारांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला. सेफ्टी दरवाजाला कडी ऐवजी कुलूप लावले असते तरी चोरट्यांना घरात येता नसते. मात्र, उकाड्यामुळे नागरिक अशा प्रकारचे बारकावे विसरून जात आहेत. परिणामी अशी चोरीची घटना घडल्यानंतर त्यांना पश्चातापाला सामोरे जावे लागत आहे. या घटनेची भुईंज पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे.