जावळीत सत्तेसाठी शहापेक्षा तहाची भूमिका

By Admin | Published: July 27, 2015 10:19 PM2015-07-27T22:19:26+5:302015-07-28T00:25:13+5:30

कार्यकर्ते संभ्रमात : दिवसा भांडाभांडी, रात्री मांडीला मांडी; सर्वच पक्षाची मोर्चेबांधणी सुरू

Things have played a role as a jawalat | जावळीत सत्तेसाठी शहापेक्षा तहाची भूमिका

जावळीत सत्तेसाठी शहापेक्षा तहाची भूमिका

googlenewsNext

मेढा : जावळी तालुक्यात ग्रामपंचायत व कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीच्या निमित्ताने राष्ट्रवादी, काँग्रेस, भाजपा व शिवसेनेच्या नेत्यांनी सुरू केलेली मोर्चेबांधणी, काहीच्या अस्तित्वाची तर काहींना प्रतिष्ठेची ठरली आहे. मात्र, पक्षाच्या काठीला गटातटाचा झेंडा लावून लढणाऱ्या काही राजकीय पदाधिकाऱ्यांची सत्तेसाठी शहापेक्षा तहाची भूमिका व दिवसा भांडाभांडी अन् रात्री मांडीला मांडीच्या भूमिकेमुळे जावळीचे राजकारण नेमके कोणत्या वळणावर चालले आहे? याबाबत कार्यकर्ते संभ्रमात पडले आहेत.मतदारसंघाच्या पुनर्रचनेत जावळी मतदारसंघ रद्द झाल्यानंतर जावळीच्या राजकारणाची दिशाच बदलली. त्यातच आमदार शशिकांत शिंदे यांचाही मतदारसंघ बदलला. राष्ट्रवादीची निर्विवाद सत्ता असलेल्या जावळीच्या राजकारणात पक्षापेक्षा गटा-तटाची झालर मोठी झाली. त्यातच स्वातंत्र्यापासून आजपर्यंत जावळीचे नेतृत्व करणारे आमदार सत्ताधारी पक्षांऐवजी विरोधी बाकावर बसले. सहकारी संस्थांवर असलेले राष्ट्रवादीचे वर्चस्व, शिवसेनेची अस्तित्वासाठीची धडपड व राज्यातील सत्तेच्या जोरावर ताकद वाढविण्यासाठी प्रयत्नशील; मात्र एकसंध नसलेल्या भाजप या पार्श्वभूमीवर होणाऱ्या या निवडणुकीत सरशी पक्षाची की, गटाची होणार याबाबत नेत्यांबरोबर कार्यकर्तेही संभ्रमात आहेत.
तालुक्यात कुडाळ, बामणोली तर्फ कुडाळ, आर्डे यासह आठ ग्रामपंचायतींची निवडणूक चुरशीची व रंगतदार होणार आहे. कुडाळ ग्रामपंचायतीत प्रतापगड कारखान्याचे सौरभ शिंदे, जितेंद्र शिंदे यांचे पॅनेल व चंद्रसेन शिंदे यांच्या पॅनेलमध्ये प्रमुख लढत असून, संजय शेवते व रोहिणी निंबाळकर या दोघांनीही स्वतंत्र पॅनेल उभे करून शिंदे गटाला शह देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे येथे चौरंगी लढत होणार आहे.
कुडाळ गटात सुनेत्रा शिंदे यांच्या गटाने आपला दबदबा व वर्चस्व आजपर्यंत कायम राखले आहे. कुडाळ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या निमित्ताने विरोधकांना नामोहरम करीत कुडाळची सत्ता अबाधित राखून आपले वर्चस्व कायम ठेवण्यासाठी शिंदे गट सरसावला आहे. तर शिंदे गटाचे वर्चस्व मोडून धक्का देण्याची तयारी चंद्रसेन शिंदे आणि इतरांनी केली आहे. बामणोली तर्फ कुडाळमध्ये राष्ट्रवादीसमोर शिवसेनेचे आव्हान उभे आहे. येथे शिवसेना तालुका प्रमुख प्रशांत तरडे यांचे पॅनेल, चंद्रकांत तरडे यांचे पॅनेल आणि विक्रम तरडे यांच्या पॅनेलमध्ये तिरंगी लढत होत आहे.
तालुक्यात राष्ट्रवादीची निर्विवाद सत्ता आमदार शशिकांत शिंदे व आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी अबाधित राखली आहे. तालुक्यात बिनविरोध झालेल्या ३३ ग्रामपंचायतींपैकी बहुतांशी ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकला आहे. तर गटातटाच्या माध्यमातून काही ठिकाणी शिवसेनेन चंचू प्रवेश केला आहे.
राज्याप्रमाणेच तालुक्यातही भाजपा-शिवसेनेची स्वतंत्र भूमिका दिसत आहे. भाजपाचे दीपक पवार यांनी भाजपाच्या माध्यमातून राष्ट्रवादीला शह देण्याची भूमिका घेतली आहे. मात्र, माजी आमदार सदाशिव सपकाळ हेदेखील भाजपवासी आहेत. राष्ट्रवादी पक्षाबरोबर मिळते जुळते घेत असल्याचे चित्र असल्यामुळे तालुक्यात भाजपा एकसंध आहे का? अशी संभ्रमावस्था कार्यकर्त्यांमध्ये आहे.
माजी आमदार सदाशिव सपकाळ यांची आमदारकीच्या पराभवानंतरची राजकीय भूमिका ही कायमच साशंक राहिली आहे. त्यामुळे सदाशिव सपकाळ हे नेमके कोणत्या पक्षाचे? अशी शंका सामान्य नागरिकांमधून व्यक्त होत आहे.
ग्रामपंचायतीबरोबरच तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये राष्ट्रवादी व भाजपा-सेना यांच्यात सरळ लढत होणार असल्याचे स्पष्ट आहे. वसंतराव मानकुमरे, अमित कदम, बाळासाहेब भिलारे आदींनी आमदार शिंदे व भोसले यांच्या नेतृत्वाखाली कृषी उत्पन्न बाजार समिती राष्ट्रवादी काँग्रेसच्याच ताब्यात ठेवण्यासाठी कंबर कसली आहे. तर भाजपाचे दीपक पवार, शिवसेनेचे तालुक्यातील नेते एस. एस. पार्टे, तालुकाप्रमुख प्रशांत तरडे आदींनी यावेळी राष्ट्रवादीच्या ताब्यात असलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीला कोणत्याही परिस्थितीत खिंडार पाडायचेच निश्चित केल्याचे चित्र आहे. त्यामुळे राजकीय वातावरण तापले आहे. (प्रतिनिधी)

४तालुक्यातील राजकारण आता तालुक्यातील नेत्यांच्या हातात आहे की, गटातटाच्या याबाबत मात्र साशंकता आहे. आमदार शशिकांत शिंदे व आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले या राष्ट्रवादीच्या नेत्यांना स्वतंत्रपणे मानणारे दोन गट जावळीत आहेत. या दोघांमध्ये पक्ष म्हणून मतभेद नसले तरी वेगळ्या गटांमुळे राजकारण ढवळून निघत आहे. यातच गटातील काही पदाधिकारी भाजपा-सेनेच्या अंतर्गत संपर्कात असल्याची चर्चा आहे. त्यामुळे दिवसा भांडाभांडी अन् रात्री मांडीला मांडी लावून बसणाऱ्या पदाधिकाऱ्यांच्या भूमिकेमुळे कार्यकर्ते मात्र संभ्रमात आहेत.

Web Title: Things have played a role as a jawalat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.