असाह्य लोकांचा विचार करा
By admin | Published: August 26, 2016 10:35 PM2016-08-26T22:35:37+5:302016-08-26T23:12:55+5:30
सुधा मूर्ती : सातारा येथे पहिला ‘लक्ष्मीबाई भाऊराव पाटील राष्ट्रीय पुरस्कार’ प्रदान
सातारा : ‘स्वत:चे जीवन आनंदी आणि सुखी होण्यासाठी भौतिक सुविधा मिळाव्यात, याचा सतत विचार सुरू असतो; परंतु त्या पलीकडे एक जीवन आहे, त्याचा विचार करावा. समाजातील हतबल, असाह्य लोकांचाही विचार केला पाहिजे. त्यासाठी जास्त पैसा गरजेचा नाही, तर समाजासाठी काम करण्याची मनोवृत्ती पाहिजे. त्यांना मदत करणे हे आपले कर्तव्य आहे, असे समजून काम केले पाहिजे,’ असे आवाहन इन्फोसिस फाउंडेशनच्या चेअरपर्सन डॉ. सुधा मूर्ती यांनी केले.
रयत शिक्षण संस्थेच्या वतीने देण्यात येणारा पहिला ‘लक्ष्मीबाई भाऊराव पाटील राष्ट्रीय पुरस्कार’ डॉ. मूर्ती यांंना प्रा. एन. डी. पाटील, माजी मंत्री डॉ. पतंगराव कदम यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी त्या बोलत होत्या.
सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात झालेल्या कार्यक्रमावेळी विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, माजी मंत्री डॉ. पतंगराव कदम, डॉ. अनिल पाटील, प्रा. एन. डी. पाटील, डॉ. दीनानाथ पाटील, उत्तमराव आवरे उपस्थित होते.
डॉ. मूर्ती म्हणाल्या, ‘साताऱ्याला आल्याबद्दल मला विशेष आनंद आहे. कारण छत्रपती शिवाजी महाराजांची ही कर्मभूमी आहे. उत्तर कर्नाटक आणि महाराष्ट्रासाठी छत्रपती शिवाजी महाराज काय आहेत, हे मला आई नेहमी सांगत असे. आई इतिहासाची शिक्षिका असल्याने शिवाजी महाराजांच्या अनेक गोष्टी सांगत असे. त्यामुळे मला नेहमी त्यांच्याबद्दल आकर्षण वाटते आणि आज त्यांच्या कर्मभूमीत यायला मिळाले, हे माझे भाग्य आहे.’
शिवरायांनी देशाला आत्मविश्वास, धैर्य, आत्मसन्मान दिला, असे सांगून डॉ. सुधा मूर्ती म्हणाल्या, ‘समाज शिक्षित व्हावा, यासाठी नेहमीच स्त्रियांनी त्याग केल्याची अनेक उदाहरणे आहेत. त्यापैकीच लक्ष्मीबाई पाटील यांचे उदाहरण म्हणता येईल. अनेक मान्यवरांनी स्तुती केली; परंतु मी स्तुतीबद्दल जास्त विचार करीत नाही. एका कानाने ऐकते आणि सोडून देते. गर्व नको म्हणून विचार करीत नाही. जीवनाबद्दल विचार करताना आपण आपल्या जीवनात भौतिक सुविधा आणि सुख कसे मिळेल, याबद्दल नेहमी विचार करीत असतो. त्यासाठी धडपडत असतो; परंतु त्या पलीकडेही एक जीवन आहे, त्याचा विचार करायला हवा. त्यासाठी काय करता येईल, हे बघावे. त्यासाठी जास्त पैसा पाहिजे, असणे गरजेचे नाही, तर जे शोषित आहेत, असाह्य आहेत, दुर्बल आहेत त्यांना मदत करणे हे आपले कर्तव्य आहे. त्यांना मदत करण्याची मनोवृत्ती पाहिजे.’ साधे सरळ जीवन कसे जगावे आणि समाजासाठी कसे जगावे, हे महाराष्ट्राकडून मी शिकले. समाजकार्यात महाराष्ट्राचे स्थान सगळ्यात वरचे आहे. त्यामुळे मला महाराष्ट्राबद्दल प्रेम आहे. मला महाराष्ट्र आणि कर्नाटक दोन्ही पाहिजे, असेही डॉ. मूर्ती म्हणाल्या.
कार्यक्रमाचे प्राचार्य गणेश ठाकूर यांनी प्रास्ताविक केले. शिवलिंग मेणकुदळे यांनी सूत्रसंचालन केले.
पुरस्काराने स्फूर्ती मिळेल
हा पुरस्कार मिळाल्याबद्दल आनंद वाटतो, असे सांगून मूर्ती म्हणाल्या, त्यासाठी मी योग्य आहे की नाही, हे माहीत नाही; परंतु आता हा पुरस्कार मिळाल्याने माझी जबाबदारी वाढली आहे. आता आणखी जबाबदारीने आणि जोमाने काम केले पाहिजे. ज्यांच्या नावाने पुरस्कार मिळाला आहे, त्यांच्यासारखे वागायला पाहिजे. कधी माझ्या कामात शिथिलता आली तर हा पुरस्कार बघितल्यानंतर मला स्फूर्ती मिळेल,’ (प्रतिनिधी)