तृतीयपंथीयांच्या कपाळी सौभाग्याचं लेणं!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2019 11:36 PM2019-01-28T23:36:24+5:302019-01-28T23:36:28+5:30
सातारा : ज्यांनी आजपर्यंत आपल्या भावनांना बांध घातला, मनानं बाई असूनही पुरुषी हावभावांमुळे समाजाची हेटाळणी सहन केली ते तृतीयपंथी ...
सातारा : ज्यांनी आजपर्यंत आपल्या भावनांना बांध घातला, मनानं बाई असूनही पुरुषी हावभावांमुळे समाजाची हेटाळणी सहन केली ते तृतीयपंथी सोमवारी साताऱ्यात स्वाभिमानानं नटले. सौभाग्याचं लेणं कपाळी लेऊन ते ताठ मानेनं उभे राहिले. महिलांकडून वाण स्वीकारून त्यांनी स्त्रीत्वाचा खरा दागिना मिळवला आणि हा हृदय सन्मान सोहळा सातारकरांनी अभिमानानं अनुभवला.
‘लोकमत’ व जाणीव सामाजिक तृतीयपंथी विकास संस्थेने तृतीयपंथींना मान, सन्मान मिळून देण्यासाठी सोमवारी शाहूपुरी माध्यमिक विद्यालयात हळदी-कुंकवाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात सातारकर महिलांनी सहभाग नोंदवल्याने तृतीयपंथीयांना प्रथमच सवाशीण होण्याचे भाग्य लाभले. तृतीयपंथींना त्यांचा हक्क मिळवून देण्यासाठी सातारकर उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते, हे विशेष. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते संविधान पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
यावेळी बोलताना पुरुषोत्तम जाधव म्हणाले, ‘तृतीयपंथीयांनी स्वत:चे उद्योगधंंदे उभे करून स्वत:ला सिद्ध करावे. त्याच्या माध्यमातून समाजव्यवस्थेला आपली दखल घेण्यास भाग पाडले पाहिजे. समाजात तुमचे अस्तित्वही अधोरेखित होण्यासाठी प्रशासकीय पातळीवर सहकार्य करण्यासाठी जनकल्याण प्रतिष्ठान कायम पाठीशी राहील.
कार्यक्रमात रेणू राय येळगावकर, प्रशांत वारकर यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास जाणीव संस्थेच्या अध्यक्षा सुनीता भोसले, सचिव राहुल भोसले, राष्ट्रीय किन्नर समाज जन पार्टीचे अध्यक्ष प्रशांत वारकर, बबलू जाधव, शोभा केंडे, लीना भोसले, माधवी शेटे, वैशाली भोसले, रत्नमाला पोवार, मेघा खरात, सुरेखा मोरे, शोभा गुजर, सुषमा जाधव, वर्षा पवार, वैशाली जाधव, अंनिसच्या वंदना माने, विवेकवाहिनीच्या शामली माने आदी मान्यवर उपस्थित होते.
संस्थेचे संस्थापक भारत भोसले यांनी प्रास्ताविकात कार्यक्रम घेण्यामागची भूमिका सविस्तरपणे विशद केली. ज्योती अडागळे आणि राधा कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले.
शाहूपुरी माध्यमिक विद्यालयाचे संयोजन
या कार्यक्रमाचे पालकत्व स्वीकारून शाहूपुरी माध्यमिक विद्यालयाने नेटके संयोजन केले होते. उपस्थितांना बसण्याची सोय शाळेच्या प्रांगणात करण्यात आली होती. त्यासाठी प्रशस्त मंडपही घालण्यात आला होता. शाळेतील आजी-माजी विद्यार्थीही यात सहभागी झाले. रांगोळी काढण्यापासून, येणाºया प्रत्येकाचे आदरातिथ्य करण्यासाठी शाळा कर्मचारी सज्ज होते.
महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
राज्यातील पहिल्याच अनोख्या अशा उपक्रमात शाहूपुरी परिसरातील महिलांनी उत्स्फूर्तपणे हजेरी लावली. यावेळी परिसरातील महिलांनी तृतीयपंथीयांना हळदी कुंकू लावून वाण लुटले. पहिल्यांदाच होत असलेला हा हृदय सोहळा मोबाईलमध्ये कैद करण्यासाठी अनेकांची धडपड दिसत होती. सातारा शहरासह उपनगरांतून ‘लोकमत’मधील बातमी वाचून कार्यक्रमासाठी आलेल्या महिलांचीही संख्या मोठी होती. माध्यमिक विद्यालयाच्या प्रांगणात सुमारे तीन तास हा कार्यक्रम रंगला.
मेकअप किटने सुखावले...!
एक कोशिश टीमच्या वतीने साताºयात नुकताच पतंग महोत्सव झाला. या कार्यक्रमातून उपलब्ध झालेल्या निधीच्या माध्यमातून तृतीयपंथीयांसाठी मेकअपचे किट उपलब्ध करून देण्यात आले. मेकअपचे किट पाहून सर्वच तृतीयपंथी सुखावले. यासाठी रेणू राय-येळगावकर, विद्या धुमाळ, सोनल झिंब्रे, सारिका चांडक, ऐश्वर्या पाटील, अश्विनी राठी, तेजस्विनी पाटील यांनी विशेष प्रयत्न केले.