कोयनेतून सांगलीच्या सिंचनासाठी तिसऱ्यांदा पाणी सोडले, १०५० क्यूसेकचा विसर्ग
By नितीन काळेल | Published: November 24, 2023 03:11 PM2023-11-24T15:11:02+5:302023-11-24T15:11:22+5:30
पायथा वीजगृहाचे एक युनीट सुरू
सातारा : दुष्काळाची स्थितीमुळे कोयना धरणातून सिंचनासाठी पाण्याची मागणी वाढू लागली आहे. त्यामुळे सांगली पाटबंधारे विभागाच्या मागणीनुसार कोयनेच्या पायथा वीजगृहाचे एक युनिट सुरू करून १०५० क्यूसेक वेगाने विसर्ग सुरू आहे. पावसाळ्यापासून सांगलीतील सिंचनासाठी आतापर्यंत तिसऱ्यांदा पाणी सोडण्यात आले आहे. तर धरणात सध्या ८५ टीएमसीच साठा शिल्लक आहे.
कोयना धरणाचीपाणीसाठवण क्षमता १०५.२५ टीएमसी इतकी आहे. या पाण्यावर पिण्याचे पाणी, सिंचन योजना आणि वीजनिर्मितीही अवलंबून आहे. मात्र, यंदा या धरणक्षेत्रात पर्जन्यमान कमी झाले. त्यामुळे धरणातील पाणीसाठा ९४ टीएमसीपर्यंतच पोहोचला होता. त्याचबरोबर साताऱ्यासह सांगली जिल्ह्यातही पाऊस कमी आहे. यामुळे धरणांतून पाणी सोडण्याची मागणी होत आहे. आताही सांगली पाटबंधारे विभागाकडून सिंचनासाठी मागणी करण्यात आली. त्यामुळे कोयना धरणातून शुक्रवारी दुपारी एकच्या सुमारास पाणी सोडण्यात आलेले आहे.
पायथा वीजगृहाचे एक युनीट सुरू करुन १०५० क्यूसेक वेगाने विसर्ग सुरू करण्यात आला आहे. हे पाणी कोयना नदीपात्रात जात आहे. तर मागील महिन्यातही सांगलीतील सिंचनासाठी धरणातून पाणी सोडण्यात आले होते. त्यावेळी पायथा वीजगृहातील दोन्ही युनीट सुरू करुन विसर्ग करण्यात आलेला. सध्या सांगलीतील सिंचनासाठी किती पाणी सोडण्यात येणार आहे, याबाबत दुपारपर्यंत निश्चिती नव्हती. तरीही आणखी काही दिवस धरणातून सांगलीतील सिंचनासाठी विसर्ग सुरू राहील, असा अंदाज आहे.
धरण भरले नसल्याने ११.७१ टीएमसी पाणी कपात..
जिल्ह्यात यावर्षी कमी पर्जन्यमान झाल्याने कोयना धरण भरले नाही. त्यामुळे सिंचन आणि वीजनिर्मितीच्या नियोजित पाणी वापरात ११.७१ टीएमसी कपात प्रस्तावित करण्यात आलेली आहे. यामध्ये सिंचनाच्या २.८६ आणि वीजनिर्मितीसाठी ८.८५ टीएमसी पाणी कपात असणार आहे.