मलकापूरात कोरोना रोखण्यासाठी तिसऱ्यांदा सर्वेक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2021 04:38 AM2021-03-05T04:38:41+5:302021-03-05T04:38:41+5:30

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव विचारात घेता स्थानिक स्वराज्य संस्थांनी कोरोना प्रतिबंधक नियमांची कडक अंमलबजावणी करण्याच्या सूचना शासनाने दिलेल्या आहेत. त्या ...

Third survey to prevent corona in Malkapur | मलकापूरात कोरोना रोखण्यासाठी तिसऱ्यांदा सर्वेक्षण

मलकापूरात कोरोना रोखण्यासाठी तिसऱ्यांदा सर्वेक्षण

Next

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव विचारात घेता स्थानिक स्वराज्य संस्थांनी कोरोना प्रतिबंधक नियमांची कडक अंमलबजावणी करण्याच्या सूचना शासनाने दिलेल्या आहेत. त्या अनुषंगाने नियोजन करण्यासाठी मलकापूर पालिकेने आशा सेविका, अंगणवाडी सेविका, नोडल अधिकारी, प्रभाग अध्यक्ष यांची संयुक्त बैठक आयोजित केली होती. बैठकीच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा निलम येडगे होत्या. उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे, मुख्याधिकारी राहुल मर्ढेकर, नगरसेवक सागर जाधव, अजित थोरात, राजू मुल्ला, जयंत कुराडे, नगरसेविका अलका जगदाळे, पर्यवेक्षक श्रीमती कुरतडकर, आरोग्य सेविका सुलोचना पावणे व पटेल, उपकेंद्राच्या डॉक्टर देसाई उपस्थित होते.

यापूर्वी शहरामध्ये कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव असतानाही त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी पालिकेने विविध उपाययोजना हाती घेतल्या होत्या. त्यामध्ये प्रामुख्याने शहरातील ६० वर्षांवरील नागरिक व १० वर्षांखालील बालकांची आरोग्य तपासणी करून त्यांना मोफत औषधोपचार पुरवठा दोनवेळा केलेला होता. तसेच आरोग्य तपासणी दरम्यान ज्या नागरिकांना कोरोनाची लक्षणे आढळून आली त्यांच्या उपचाराची सोय केली होती. सर्वांनी अहोरात्र काम केल्यामुळे नवीन वर्षामध्ये शहर कोरोनामुक्त झाले होते. मात्र, पुन्हा कोरोनाने डोके वर काढले आहे. याचा शहरात पुन्हा प्रादुर्भाव होऊ नये, म्हणून पूर्वतयारीच्या उपाययोजना हाती घेतल्या आहेत. आशा सेविका व अंगणवाडी सेविकांमार्फत आरोग्य तपासणीचे काम हाती घेतले आहे. त्यामुळे नागरिकांनी खरी वस्तुस्थिती सांगून पालिकेस सहकार्य करावे.

लक्षणे आढळून आल्यास तातडीने आशा सेविकांशी अथवा पालिकेशी संपर्क साधावा. आगाशिवनगर येथे प्राथमिक आरोग्य उपकेंद्रामध्ये मोफत औषधोपचाराची सोय आहे. नागरिकांनी कोरोनाचा प्रादुर्भाव असलेल्या शहरातून आलेल्या नागरिकांची माहिती नोडल अधिकारी अथवा आशा सेविका यांना तत्काळ द्यावी, असे आवाहन नगराध्यक्षा निलम येडगे, उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे व मुख्याधिकारी राहुल मर्ढेकर यांनी केले.

- चौकट

नऊ प्रभागात नोडल अधिकाऱ्यांसह भरारी पथक

पालिकेने शरद कदम, हेमंत पलंगे, प्रसाद बुधे, रामचंद्र शिंदे, वैभव आरणे, मनोहर पालकर, जगन्नाथ मुडे, दादासाहेब शिंदे, पांडुरंग बोरगे यांची अनुक्रमे प्रभाग १ ते ९ प्रभाग निहाय नोडल अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या आहेत. तर त्यांच्यासोबत आशा सेविका काम करणार आहेत. याबरोबरच करनिरीक्षक राजेश काळे यांच्या नेतृत्वाखाली भरारी पथक तैनात केले आहे.

Web Title: Third survey to prevent corona in Malkapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.