हातपंप भागवतायत नागरिकांची तहान!

By admin | Published: May 4, 2016 09:33 PM2016-05-04T21:33:09+5:302016-05-04T21:33:09+5:30

चोवीस तास पाणी : पालिकेची योजना अद्यापही अपूर्णच; पाणपोईसोबत तहानलेल्यांना कूपनलिकांचाही आधार

Thirst of the people holding hands! | हातपंप भागवतायत नागरिकांची तहान!

हातपंप भागवतायत नागरिकांची तहान!

Next

कऱ्हाड : शहरातील लोकांना शुद्ध व नियमितपणे पाणी मिळावे यासाठी नगरपालिकेकडून येथील बारा डबरी परिसरात चोवीस तास पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू करण्यात आले. मात्र, ते अद्यापही पूर्ण झालेले नाही. तर जुन्याच योजनेवर शहरात पाणीपुरवठा हा केला जातोय. शहरात अनेकवेळा काही कारणांनी पाणीपुरवठा विस्कळीत झाल्यास नागरिकांना कूपनलिकांमधून थंडगार पाणी घ्यावे लागते. शहरातील या कूपनलिका आजही चोवीस तास पाणी देत आहेत.
कऱ्हाड शहरासह वाढीव त्रिशंकू भागातील लोकांची पाण्याची समस्या दूर व्हावी म्हणून कऱ्हाड नगरपालिकेने शहराच्या ठिकठिकाणी कूपनलिका बसविल्या. भूगर्भातून पाईपच्या माध्यमातून हाताच्या दाबाने पाणी वर काढता यावे अशा पद्धतीने कूपनलिकांची रचना करण्यात आली. त्याचा वापर आजही खेडोपाडी नियमित केला जातो. तर शहरातही पालिकेच्या वतीने कूपनलिका बसविण्यात आलेल्या असून, त्यांना चोवीस तास पाणी आहे. शहरातील विविध ठिकाणी बसविण्यात आलेल्या कूपनलिकांतून चोवीस तास शुद्ध पाणी मिळत असल्याने कधीकाळी पाणी न आल्यास शहरातील नागरिक व महिला या कूपनलिकांचाच आधार घेतात. कऱ्हाड शहरात १२८ कूपनलिका आहेत. तर शहर ग्रामीण भागात ५१ हातपंप आहेत. चोवीसहून अधिक ठिकाणी दुरवस्थेत असलेल्या काही कूपनलिकांमध्ये पाणीच नाही. तर काहींमध्ये पाणी आहे. परंतु त्यांची अवस्था चांगली नाही. त्याची दुरुस्ती केल्यास त्यातून पाणी मिळू शकते.
शाहू चौक येथे पाण्याची बोरिंग आहे. त्यातील पाणीही शुद्ध आहे. मात्र त्याची डागडुजी करणे गरजेचे आहे. रणजित टॉवर परिसरात दोन कूपनलिका बोरिंगमध्ये बदलण्यात आल्या आहेत. मात्र, त्यासुद्धा बंद पडल्या आहेत. पाटण कॉलनीत पूर्वी कूपनलिका होती. मात्र, वाहनधारकांकडून वाहन धुण्यासाठी येथील पाण्याचा वापर केला जाऊ लागल्याने पालिकेने ती कूपनलिकाच काढून टाकली. शहरात अशाप्रकारे अनेक ठिकाणी बंद पडलेल्या अवस्थेत असलेल्या कूपनलिकांची दुरुस्ती केल्यास नागरिकांना यातून स्वच्छ व चांगले पाणी मिळू शकते.सध्या सर्वत्र पाण्याची बचत करण्यासाठी जनजागृती केली जात आहे. तसेच दुसरीकडे ग्रामीण भागातील विहिरी, कूपनलिका यांतील पाणी आटल्याने त्या ठिकाणी कूपनलिका काढण्याचे काम प्रशासनाने हाती घेतले आहे. त्याचप्रमाणे गरजेनुसार पाणी वापरण्याच्या सूचना पालिका प्रशासनाकडून नागरिकांना देण्यात आलेल्या आहेत. घरगुती नळांना पाणी न आल्यास महिलांना अशा कूपनलिकांचाच मोठा आधार मिळत आहे. (प्रतिनिधी)


योजना बंद; पण कूपनलिका चालू
कऱ्हाडकरांसाठी पालिकेने चोवीस तास पाणी योजना उभारण्याचे काम सुरू केले. योजनेचे दोन ते तीन वर्षांपासून काम सुरू होते. ते आता बंद पडले आहे. मात्र दहा ते पंधरा वर्षांपूर्वी बसविण्यात आलेल्या काही कूपनलिका अजूनही चालू आहेत. पालिकेने या कूपनलिकांची दुरुस्ती व देखभाल करणे गरजेचे आहे. कूपनलिकांतून नागरिकांना पाणी मिळत असून, त्याची जपणूक करणेही तितकेच गरजेचे आहे.

चोवीस
तास
पाणी उपलब्ध
शहरातील नागरिकांना चोवीस तास पाणी मिळावे म्हणून पालिकेकडून चोवीस तास पाणीपुरवठा योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला. मात्र, गेल्या दोन वर्षांपासून या योजनेचे काम संथगतीने सुरू आहे. मध्यंतरी योजनेचे काम बंदही पडले होते. मात्र, कामासाठी वाढीव मुदत मिळाल्याने योजनेचे काम सुरू करण्यात आले आहे. परंतु अद्यापही योजना पूर्ण झालेली नाही. याऊलट कूपनलिकांमध्ये अजूनही पाणी जास्त प्रमाणात असल्याने यातून चोवीस तास पाणीउपसा केला जातो.

Web Title: Thirst of the people holding hands!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.