मूर्ती लहान, पण कर्तृत्व महान; स्वत:च्या बोअरवेलमधून भागवतो गावाची तहान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2019 02:49 AM2019-04-25T02:49:04+5:302019-04-25T06:37:24+5:30
सातारा जिल्ह्यातील खोकडवाडीतील साठ घरांना नळ कनेक्शनने पाणी
- भोलेनाथ केवटे
सातारा : दुष्काळामध्ये पाण्यासाठी ग्रामस्थांचे होणारे हाल थांबवण्यासाठी खोकडवाडी येथील एका शेतकऱ्याने सामाजिक बांधिलकीतून स्वखर्चातून आपल्या शेतात बोअरवेल खोदली. गेल्या सात वर्षांपासून ते या बोअरवेलमधून संपूर्ण गावाला पाणी पुरवठा करून ग्रामस्थांची तहान भागवत आहेत.
सातारा तालुक्यातील खोकडवाडी हे ६० ते ६५ घरांचं छोटंसं गाव. दुष्काळामुळे गावात पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. हंडाभर पाण्यासाठी काही किलोमीटर जावे लागते. गावातील विहिरीचे पाणी पिण्यायोग्य नाही. ग्रामस्थांचे होणारे हाल थांबण्यासाठी संतोष सावंत यांनी सात वर्षांपूर्वी शेतात एक बोअरवेल केले. तेथून प्रत्येक घरापर्यंत त्यांनी स्वखर्चातून अडीच ते तीन किलोमीटर पाईपलाईन करून त्याद्वारे गावातील प्रत्येक घरात नळ कनेक्शन दिले. सकाळी सहा ते अकरा या वेळेत टप्प्याटप्प्याने प्रत्येक भागात पाणीपुरवठा केला जातो. त्यांनी मागच्या वर्षी अजून एक बोअरवेल घेतली आहे; मात्र पहिल्याच बोअरला भरपूर पाणी असल्याने दुसरी बोअर त्यांनी बंदच ठेवली आहे.
आपण गावासाठी काहीतरी करावे, यातूनच शेतातील बोअरमधून गावात स्वखर्चाने पाईपलाईन करून प्रत्येक घरात पाणी पुरवठा करण्याची व्यवस्था आम्ही केली आहे.
- संतोष सावंत, ग्रामस्थ