तेरा किलोमीटरमध्ये तीस ठिकाणी धोका!
By admin | Published: July 3, 2015 09:54 PM2015-07-03T21:54:00+5:302015-07-04T00:04:15+5:30
ढेबेवाडी मार्गाची वाट बिकट : फरशी पुलांना नाहीत संरक्षक कठडे; धोक्याची सूचना देणाऱ्या फलकांचीही वानवा; प्रवाशांचा जीव मुठीत
गणेश काटेकर - कुसूर -कऱ्हाड-ढेबेवाडी मार्गावरील लहान-मोठ्या ओढ्यांवर बांधण्यात आलेल्या पुलांची दयनीय अवस्था झाली आहे. पुलाशेजारी वाढलेल्या गवत झुडपांमुळे कमी उंचीचे संरक्षक कठडे पूर्ण झाकून गेले आहेत. एकाही ठिकाणी पूलदर्शक फलक लावले नसल्याने नेहमीचीच लहान-मोठ्या अपघाताची मालिका सुरू आहे. परिणामी संबंधित विभागाने पूलदर्शक फलक व कठड्यांची दुरुस्ती करण्याची मागणी वाहनधारकांमधून होत आहे.
कऱ्हाड-ढेबेवाडी मार्गावरील तारुख ते ढेबेवाडी फाटा या १६ किलोमीटरच्या अंतरामध्ये तारुख येथील पूल सोडला तर एकाही पुलाला संरक्षक कठडा बांधण्यात आलेला नाही. लहान-मोठ्या ओढ्यांवर पूल बांधण्यात आले असले तरी काही पुलांना संरक्षण कठडेच बांधण्यात आलेले नाहीत. तर काही पुलांच्या संरक्षण कठड्यांची उंची फक्त अर्धा ते एक फूट एवढीच आहे. काही पुलांचे कठडे तुटले असल्यामुळे धोकादायक परिस्थिती निर्माण झाली आहे. पूलदर्शक फलक एकाही ठिकाणी लावले नसल्यामुळे वारंवार अपघात होत आहेत. रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी गवत-झुडपांमुळे कमी उंचीच्या पुलाचे संरक्षक कठडे पूर्णत: झाकून गेले आहेत. उंच वाढलेल्या गवतामुळे पूल असल्याचे वाहन चालकाच्या दिवसाही निदर्शनास येत नाही. तसेच वळणावरही रिफ्लेक्टर दिवे लावण्यात आले नसल्यामुळे रात्रीच्या वेळी अनेक वाहने रस्त्यावरून खाली गेल्याच्या घटना घडल्या आहेत.