अभियांत्रिकीच्या तेराशे विद्यार्थ्यांचा जीव भांड्यात...

By admin | Published: February 4, 2015 10:36 PM2015-02-04T22:36:14+5:302015-02-04T23:51:58+5:30

‘लोकमत’चे कौतूक : दुसऱ्या सत्राचा परीक्षा फॉर्म भरण्याची प्रक्रिया दोन दिवसांत सुरू होणार

Thirteen students of engineering ... | अभियांत्रिकीच्या तेराशे विद्यार्थ्यांचा जीव भांड्यात...

अभियांत्रिकीच्या तेराशे विद्यार्थ्यांचा जीव भांड्यात...

Next

कऱ्हाड : येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचा दुसऱ्या सत्राचा परीक्षा फॉर्म भरण्याची प्रक्रिया येत्या दोन दिवसात सुरू होणार आहे. त्यामुळे प्रथम, द्वितीय, तृतीय व अंतिम वर्षात विविध शाखांमध्ये शिक्षण घेणाऱ्या सुमारे १ हजार ३०० विद्यार्थ्यांचा जिव भांड्यात पडला आहे. विद्यार्थ्यांचा राखून ठेवण्यात आलेला निकाल जाहीर करण्यापासून या सर्व प्रकाराचा ‘लोकमत’ने पाठपुरावा केला. या पाठपुराव्यामुळेच प्रक्रीया सुरळीत झाल्याची भावना विद्यार्थ्यांतून व्यक्त होत आहे.
कऱ्हाड शहरातील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात स्थापत्य, यंत्र, विद्युत, माहिती तंत्रज्ञान, ई अ‍ॅन्ड टीसी या शाखांमध्ये प्रथम, द्वितीय, तृतीय व अंतिम वर्षात मिळून सुमारे १ हजार ३०० विद्यार्थी शिक्षण घेतात. या विद्यार्थ्यांची प्रथम सत्राची परीक्षा डिसेंबर २०१४ मध्ये पार पडली. त्यानंतर विद्यापीठाकडून निर्धारित वेळेत इतर महाविद्यालयांचा निकाल जाहीर करण्यात आला. मात्र, कऱ्हाडच्या अभियांत्रिकी महाविद्यालयाचा निकाल राखून ठेवण्यात आला. कऱ्हाडच्या महाविद्यालयाचे प्राध्यापक पेपर तपासणीसाठी आले नसल्यामुळे निकाल राखून ठेवल्याचे त्यावेळी विद्यार्थ्यांना सांगण्यात आले.
निकाल न लागल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात आले. ‘लोकमत’ने याबाबत आवाज उठविला. त्यानंतर निकाल लागला. निकाल जाहीर झाल्यानंतर पेपर पुनर्तपासणीला मुदत मिळणार का, व दुसऱ्या सत्राचा परीक्षा फॉर्म भरताना विलंब शुल्क द्यावे लागणार का, हे प्रश्न विद्यार्थ्यांसमोर उभे ठाकले. ‘लोकमत’ने विद्यार्थ्यांच्या या प्रश्नांबाबतही आवाज उठविल्यानंतर महाविद्यालयाने विद्यार्थ्यांना विलंब शुल्क आकारण्यात येणार नसल्याचे स्पष्ट करीत दोन दिवसात फॉर्म भरून घेण्याची प्रक्रिया सुरू होईल, असे सांगितले.
दुसऱ्या सत्राची पक्रीया सुरळीत झाल्यामुळे सध्या विद्यार्थ्यांत समाधानाचे वातावरण आहे. सुमारे तेराशे विद्यार्थ्यांनी पेपर पुनर्तपासणीचा अर्ज भरण्यासह दुसऱ्या सत्राचा परीक्षा फॉर्म भरण्यासाठीची तयारी सुरू केली आहे. दरम्यान, विद्यार्थी कल्याण मंडळाचे अध्यक्ष पंकज मोरे हे येत्या दोन दिवसांत महाविद्यालयाच्या प्राचार्यांना भेटणार आहेत.
‘विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर होण्यास कोणामुळेही विलंब झाला असला तरी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार होते. ‘लोकमत’ने गत आठ दिवसांपासुन याचा पाठपुरावा केला. त्याबरोबरच मी विद्यापीठ व महाविद्यालयाच्या प्राचार्यांशी संपर्कात होतो. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, अशी आमची अपेक्षा आहे’, अशी प्रतिक्रिया मोरे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. (प्रतिनिधी)

शैक्षणिक वर्षातील प्रत्येक दिवस आमच्यासाठी महत्वाचा असतो. असे असताना निकाल जाहीर होण्यास विलंब झाला; पण ‘लोकमत’ने याला वाचा फोडल्यानंतर सर्व प्रक्रीया सुरळीत झाली.
- हर्षदा जेधे, विद्यार्थीनी


शनिवारपर्यंत निकालही जाहीर झाला नव्हता. आज मात्र फॉर्म भरण्याची प्रक्रिया दोन दिवसांत सुरू होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. हे सर्व ‘लोकमत’च्या पाठपुराव्यामुळे शक्य झाले.
- अंकिता सुतार, विद्यार्थीनी


निकाल जाहीर होण्यामागे चूक कोणाचीही असली तरी त्यामुळे विद्यार्थ्यांची काय परिस्थिती झाली याचा विचार करायला पाहिजे होता. या प्रश्नाला योग्यवेळी वाचा फोडल्याबद्दल आम्ही ‘लोकमत’चे आभारी आहोत.
- विष्णू जाधव, विद्यार्थी

चार-पाच दिवसांपूर्वी सर्वच बाबतीत आम्ही संभ्रमात होतो. याची माहिती दिली जात नव्हती. ‘लोकमत’मुळे आमच्यावरील परिस्थिती सर्वांसमोर आली. त्यानंतर लगेचच निर्णय होत गेले.
- अमित भुयार, विद्यार्थी

Web Title: Thirteen students of engineering ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.