तीस कोटींच्या सुशोभिकरणाने पर्यटन गरीचे रुपडे पालटणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2021 04:35 AM2021-03-07T04:35:59+5:302021-03-07T04:35:59+5:30
पाचगणी : राज्य शासनाच्या पर्यटन विकासअंतर्गत महाबळेश्वर व पाचगणी या दोन्ही गिरिस्थानांच्या सुशोभिकरणाकरिता व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या महत्त्वपूर्ण ...
पाचगणी : राज्य शासनाच्या पर्यटन विकासअंतर्गत महाबळेश्वर व पाचगणी या दोन्ही गिरिस्थानांच्या सुशोभिकरणाकरिता व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या महत्त्वपूर्ण योजनेतून या शहरांकरिता १०० कोटींची तरतूद महाविकास आघाडी सरकारच्यावतीने करण्यात आली आहे.
पाचगणी शहराच्या अंतर्गत विकासाकरिता यापैकी ३० कोटी रुपये स्थानिक आमदार मकरंद पाटील यांच्या प्रयत्नातून पाचगणी शहरास मिळणार आहेत. त्या विकास आराखड्याचा ३० कोटींचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करण्यात येणार आहे.
पाचगणी शहर हे शैक्षणिक केंद्र तसेच आशिया खंडातील दोन नंबरचे पठार टेबललँड असल्याने येथील सौंदर्य सिनेनगरीला भुरळ घालते. त्यामुळे अनेक चित्रपट तसेच मालिका यांचे चित्रीकरण होत असते. त्यामुळे पर्यटकांच्या आकर्षणाचे मुख्य केंद्र म्हणून जागतिक नावलौकिक या गिरिस्थानाचा आहे.
पाचगणी शहराचा विकास या पर्यटन विकास आराखड्याअंतर्गत होणार असून, यामध्ये टेबललँड येथील स्टाॅल्स पुनर्वसन, कारपार्किंग, परिसर सुशोभिकरण करणे, घोडेस्वारी, पाथ वे विकसित करणे, पाचगणी नगरपालिका हद्दीतील राज्यमार्गावरील दांडेघर नाका येथे रस्ता रुंदीकरण, टोलप्लाझा विकसित करणे, नगरपालिका मालकीचे पारसी पाॅईंट येथे विहंगम गॅलरी, फूट प्लाझा, संरक्षक भिंत, पार्किंग आणि परिसर सुशोभिकरण करणे, सिडने पाॅईंट येथे आकर्षक पथदिवे, पाचगणी नगरपालिका हद्दीतील रस्ते व त्यालगत फूटपाथ नूतनीकरण दुरुस्ती, नवीन फूटपाथ विकसित करणे, कॅनोपी आणि पथदिवे बसवणे, पाचगणी शहरात हरितपट्टे व वृक्षारोपण करणे, शहरातील पार्किंग प्लॉटवर मेकॅनिकल मल्टिलेव्हल पार्किंग करणे आदी सुविधा पाचगणी शहराच्या सुशोभिकरण अंतर्भूत करण्यात आल्या आहेत. पाचगणी शहराला देशपातळीवर स्वच्छ सर्वेक्षणात प्रथम क्रमांक मिळवून देणाऱ्या नगराध्यक्षा, सर्व नगरसेवक तसेच पाचगणी शहरातील सर्वसामान्य नागरिकांचे लक्ष या नावीन्यपूर्ण सुशोभिकरणाकडे वेधले गेले आहे.
(कोट..)
पाचगणी पर्यटनस्थळास नुकतेच ‘ब’ वर्ग पर्यटनस्थळ म्हणून स्थान मिळाले आहे. त्यातच राज्य शासनाच्या पर्यटनस्थळ विकास कार्यक्रमांतर्गत सुशोभिकरणाच्या कामामुळे शहराच्या सौंदर्यात अधिकच भर पडल्याने येथे येणारा पर्यटक अधिक भारावून जाणार आहे. त्यातून पर्यटन वृद्धी नक्कीच होईल.
- गिरीश दापकेकर, मुख्याधिकारी
(कोट..)
पाचगणी नगरपरिषद
स्वच्छ सर्वेक्षणात देशपातळीवर प्रथम क्रमांक मिळविणाऱ्या पाचगणी शहराचा नावलैाकिक जागतिक पातळीवर पोहोचला आहे. शहराच्या सुशोभिकरणात महाविकास आघाडी शासनाकडून मिळालेल्या ३० कोटी रुपयांच्या तरतुदींमुळे शहराचे रुपडेच पालटणार आहे. त्यामुळे शहराचे सौंदर्य अधिकच बहरणार आहे.
- लक्ष्मी कऱ्हाडकर, नगराध्यक्षा, पाचगणी