आग्रा ते राजगड शिवज्योत घेऊन निघाले तीस मावळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2021 04:41 AM2021-08-23T04:41:35+5:302021-08-23T04:41:35+5:30
आदर्की : छत्रपती शिवाजी महाराजांच्या धैर्याचे स्मरण करण्यासाठी महाराष्ट्रातील तीस शिवप्रेमी मावळे गरुडझेप मोहिमेअंतर्गत आग्रा ते राजगड अशी शिवज्योत ...
आदर्की : छत्रपती शिवाजी महाराजांच्या धैर्याचे स्मरण करण्यासाठी महाराष्ट्रातील तीस शिवप्रेमी मावळे गरुडझेप मोहिमेअंतर्गत आग्रा ते राजगड अशी शिवज्योत आणणार आहेत. या मोहिमेला मंगळवारी सुरुवात झाली. सुमारे बाराशे किलोमीटरची ही मोहीम असून २९ ऑगस्टला ती पूर्ण होणार आहे. उत्तर प्रदेश, राजस्थान, मध्यप्रदेश, महाराष्ट्र अशा चार राज्यांतील ५८ शहरातून रोज सुमारे १०० ते १२० किलोमीटर धावून ही मोहीम पूर्ण करणार आहेत.
या मोहिमेचे नेतृत्व इतिहास अभ्यासक दुर्गवीर ॲड. मारुती आबा गोळे हे करणार आहेत. औरंगजेबाने छत्रपती शिवाजी महाराजांना आग्रा येथे नजरकैदेत ठेवले होते आणि मोगलांच्या नजरकैदेतून अत्यंत चाणाक्ष बुद्धीने युक्ती लढवित महाराज गरुडझेप घेऊन राजगडावर सुखरूप पोहोचले.
या घटनेला ३५५ वर्षे पूर्ण होत आहेत. ही घटना म्हणजे हिंदवी स्वराज्याच्या दिशेने छत्रपती शिवाजी महाराजांनी घेतलेली गरुडझेप होती. आजही या ऐतिहासिक घटनेमुळे सकल मराठी तसेच हिंदू जनांच्या मनात प्रेरणेची, शौर्याची आणि धैर्याची लहर दौडते. शेकडो वर्षे पारतंत्र्यात परकियांच्या जोखडाखाली पिचलेल्या जनतेला स्वातंत्र्याचा मंत्र देत हिंदवी स्वराज्याची मुहूर्तमेढ महाराजांनी रोवली होती.
ब्रिटिशांना हद्दपार करण्याचे काम भारतीयांनी १९४७ मध्ये केले. त्यांच्या या संघर्षामागे छत्रपती शिवाजी महाराजांच्या झुंजार लढ्याची प्रेरणा होती. हीच प्रेरणा जिवंत ठेवत महाराष्ट्रातील तीस मावळे यामध्ये सहभागी झाले आहेत. १७ ऑगस्टला आग्रा येथील लाल किल्ल्यापासून या मोहिमेला सुरुवात झाली. २९ व ३० ऑगस्ट रोजी हे मावळे शिवज्योत घेऊन राजगडावर पोहोचणार आहेत.
प्रतिक्रिया
आग्रा येथून १७ ऑगस्ट रोजी तीस मावळे शिवज्योत घेऊन राजगड येथे दि. २९ रोजी येत आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आग्राहून सुटकेला ३५५ वर्षे पूर्ण होत आहेत. याची आठवण म्हणून ही मोहीम राबविली आहे.
आकाश राजेंद्र गोळे
अध्यक्ष, फलटण तालुका सरनौबत नरवीर पिलाजी गोळे प्रतिष्ठान
फोटो २२आदर्की
छत्रपती शिवाजी महाराजांच्या आग्राहून सुटकेला ३५५ वर्षे होत आहेत. याची आठवण म्हणून आग्राहून ३० मावळे शिवज्योत घेऊन राजगडावर निघाले आहेत.