मलकापूरला रात्रीत तेरा चोऱ्या

By admin | Published: July 7, 2014 11:05 PM2014-07-07T23:05:57+5:302014-07-07T23:06:25+5:30

चोरट्यांचा धुमाकूळ : पतसंस्था, फ्लॅट, बांधकाम कार्यालय, दुकाने फोडली

Thirty thieves in Malkapur in the night | मलकापूरला रात्रीत तेरा चोऱ्या

मलकापूरला रात्रीत तेरा चोऱ्या

Next

मलकापूर (जि. सातारा) : शहरातील कोयना वसाहत परिसरात काल, रविवारी रात्री चोरट्यांनी धुमाकूळ घातला. एकाच रात्रीत त्यांनी तीन पतसंस्था, सात फ्लॅट, बांधकाम कार्यालय व दोन दुकाने फोडली. दरम्यान, चोरट्यांनी फोडलेले सर्व फ्लॅट बंद असल्याने त्यातील किती ऐवज चोरीस गेला, याबाबतची पोलिसांना खात्रीशीर माहिती मिळाली नव्हती. मात्र, पतसंस्था, आॅफिस व दुकानातून सुमारे लाखाचा ऐवज लंपास झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
मलकापूर येथे चोरट्यांनी सुरुवातीला मंगलमूर्ती नागरी सहकारी पतसंस्था फोडली. या संस्थेतील ७६ हजारांची रोकड लंपास केली. त्यानंतर कृष्णा-कोयना व जनकल्याण पतसंस्थेचे शटर उचकटून दोन्ही संस्थांमध्ये चोरीचा प्रयत्न झाला. मात्र, दोन्ही पतसंस्थांमध्ये चोरट्यांच्या हाती काहीही लागले नाही. त्यानंतर चोरट्यांनी फ्लॅटकडे मोर्चा वळविला. भाग्यश्री अपार्टमेंटमधील गायकवाड कुटुंबीयांचा एक बंद फ्लॅट, सुयश रेसिडेन्सीमधील तीन बंद फ्लॅट, ओमकार अपार्टमेंट, सुयश प्लाझामधील प्रत्येकी एक फ्लॅट चोरट्यांनी फोडले. त्याचबरोबर कोयना औद्योगिक वसाहतीजवळील ‘चंदन प्लाझा’ इमारतीमधील मिलिंद नारायण देवळेकर यांच्या मालकीचे फॉर्मिंग ज्वेलरीचे दुकान फोडले.
चोरट्यांनी दुकानातील बांगड्या, नेकलेस, चांदीच्या अंगठ्या, मोती आणि पोवळ्यांची माळ, असा सुमारे २५ हजारांचा ऐवज लंपास केला. तेथून जवळच असलेल्या वक्रतुंड अपार्टमेंटमधील सी. बी. कन्स्ट्रक्शनचे कार्यालय फोडून २० हजारांचा जनरेटर व लक्ष्मी पूजनासाठी कायमस्वरूपी ठेवलेली दोन हजारांची रोकडही चोरट्यांनी लंपास केली. विवेक रामचंद्र जगताप यांच्या वाहनांच्या सुट्या भागांचे दुकान फोडून काही ऐवज लंपास केला.
या घटना आज, सोमवारी सकाळी उघडकीस आल्यानंतर पोलीस उपअधीक्षक मितेश घट्टे यांच्यासह पोलीस अधिकाऱ्यांनी त्याठिकाणी भेट दिली.
पतसंस्था, ज्वेलरी दुकान, कन्स्ट्रक्शन आॅफिस व स्पेअर पार्ट दुकानातील चोरीस गेलेल्या मालाची नोंद केली. मात्र, फोडलेल्या सातही फ्लॅटच्या मालकांविषयी पोलिसांना आज रात्री उशिरापर्यंत माहिती मिळाली नाही. त्यामुळे फ्लॅटमधून चोरीस गेलेल्या ऐवजाचा तपशील पोलिसांना समजू शकला नाही. या घटनेची नोंद कऱ्हाड शहर पोलीस ठाण्यात झाली आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Thirty thieves in Malkapur in the night

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.