‘त्या’ हल्लेखोरांनी हाॅटेल व्यावसायिकावरही रोखली बंदूक, तपास अंतिम टप्प्यात; तपासासाठी पाच पथके रवाना
By दत्ता यादव | Published: January 25, 2023 09:13 PM2023-01-25T21:13:31+5:302023-01-25T21:13:38+5:30
सातारा : जुन्या गाड्यांचा खरेदी- विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या अमित भोसले (वय ३८, रा. शुक्रवार पेठ, सातारा ) यांच्यावर गोळीबार केल्यानंतर हल्लेखोरांनी एका ...
सातारा : जुन्या गाड्यांचा खरेदी- विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या अमित भोसले (वय ३८, रा. शुक्रवार पेठ, सातारा) यांच्यावर गोळीबार केल्यानंतर हल्लेखोरांनी एका हाॅटेल व्यावसायिकावरही बंदूक रोखली होती. ही धक्कादायक माहिती पोलिसांच्या तपासात समोर आली असून, आरोपींच्या शोधासाठी पोलिसांची पथके विविध ठिकाणी रवाना झाली आहेत. हल्लेखोरापर्यंत पोलिस पोहोचले असून, हा तपास अंतिम टप्प्यात असल्याचे पोलिस सांगतायत.
व्यावसायिक अमित भोसले हे सोमवारी रात्री त्यांच्या मैत्रिणीसमवेत वाढे फाट्यावरील एका हाॅटेलमध्ये गेले होते. त्यावेळी दोघा हल्लेखोरांनी अमित भोसले यांच्यावर अंदाधुंद गोळीबार केला. मात्र, त्यातूनही ते वाचल्याने त्यांचा गळा चिरून खून करण्यात आला. हा प्रकार तेथे उपस्थित असलेले हाॅटेल व्यावसायिक पाहत होते. त्यावेळी हल्लेखोरांनी त्या हाॅटेल व्यावसायिकावरही बंदूक राेखून त्यांना धमकावले. यानंतर त्यांच्या हाॅटेलमधील कांदा कापण्याची सुरी घेऊन तेथून हल्लेखोर पसार झाले.
दरम्यान, अमित भोसले यांच्या खून प्रकरणाच्या तपासासाठी पोलिसांनी पाच पथके तयार केली आहेत. दोघे हल्लेखोर साताऱ्यातील बऱ्याच सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहेत. त्यामुळे चोरट्यांचा तपास अंतिम टप्प्यात असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. अमित भोसले हे रात्री जेवण करण्यासाठी मैत्रिणीसोबत बाहेर पडणार होते. हे ज्यांना माहिती होते. त्यांनीच हा खून केला असल्याचे तपासात समोर येत आहे.