‘त्या’ पोलिसांची बॅँक खाती गोठविली

By admin | Published: April 18, 2017 12:55 AM2017-04-18T00:55:34+5:302017-04-18T00:55:34+5:30

वारणानगर चोरी प्रकरण : पोलिस निरीक्षक घनवट याचा कोल्हापुरातील फ्लॅट सील

'Those' police frozen bank accounts | ‘त्या’ पोलिसांची बॅँक खाती गोठविली

‘त्या’ पोलिसांची बॅँक खाती गोठविली

Next



कोल्हापूर : वारणानगर (ता. पन्हाळा) येथील शिक्षक कॉलनी चोरी प्रकरणात संगनमताने नऊ कोटी १८ लाख रुपये परस्पर हडप करणाऱ्या पोलिस निरीक्षक विश्वनाथ घनवट याचा कोल्हापुरातील ३४ लाखांचा अलिशान फ्लॅट सील केला. चोरीतील १८ लाख रुपये त्याच्या बँक खात्यावर असल्याचे निष्पन्न झाल्याने त्याचे तसेच सहायक पोलिस निरीक्षक सूरज चंदनशिवे व अन्य सहा संशयितांची बॅँक खाती सोमवारी पोलिसांनी गोठविली.
या सर्वांनी पुणे, कोल्हापूर, सांगली, सोलापूर जिल्ह्यांत जमीन खरेदी, स्थावर मालमत्ता, आदीमध्ये नातेवाइकांच्या नावे चोरीचा पैसा गुंतविल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. ही संपूर्ण मालमत्ता कायदेशीर प्रक्रियेद्वारे जप्त केली जात आहे. याप्रकरणी भक्कम पुरावे मिळाले असून, त्याची व्याप्ती वाढत आहे, अशी माहिती कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी सोमवारी दिली.
वारणानगर येथील शिक्षक कॉलनी बिल्डिंग नंबर ५ मधील चोरी प्रकरणात तपासाच्या नावाखाली सांगलीचे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे तत्कालीन पोलिस निरीक्षक विश्वनाथ घनवट, सहायक पोलिस निरीक्षक चंदनशिवे, सहायक फौजदार शरद कुरळपकर, हवालदार दीपक पाटील, शंकर पाटील, पोलिस नाईक रवींद्र पाटील, कुलदीप कांबळे यांनी संशयित मैनुद्दीन मुल्ला याला हाताशी धरून ९ कोटी १८ लाख रुपये लाटले. या प्रकरणी या सर्वांच्या विरोधात रविवारी कोडोली पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल झाला आहे.
निरीक्षक घनवट याने चोरीचे ३ कोटी १८ लाख रुपये घेतले. तर सहांयक पोलिस निरीक्षक चंदनशिवे याने ६ कोटी रुपये घेऊन ते नातेवाईक प्रवीण सावंत याच्या बँक खात्यावर भरले. अन्य संशयित सहकाऱ्यांना कमी-जास्त प्रमाणात रक्कम देत त्यांनाही खूश ठेवले होते. या प्रकरणी तपासासंबंधी विशेष पोलिस महानिरीक्षक नांगरे-पाटील यांना विचारले असता, कोल्हापूर पोलिसांनी केलेल्या तपासात या सर्वांनी ही रक्कम स्वत:च्या नावे न ठेवता नातेवाईकांच्या नावे ठेवली तर काहींनी जमीन, स्थावर मालमत्ता नातेवाईकांच्या नावे खरेदी करून गुंतविल्याचे निष्पन्न झाले आहे. घनवट याने कोल्हापुरात या रकमेतून अलिशान फ्लॅट खरेदी केला होता. तो सील केला आहे तसेच त्याच्या बँक खात्यावर १८ लाख रुपये मिळाले. त्याच्यासह अन्य संशयितांची बँक खाती गोठविली आहेत. गेल्या पाच महिन्यांपासून हा तपास सुरू आहे. संशयितांच्या विरोधात भक्कम पुरावे आहेत. प्रकरणाची व्याप्ती वाढत असल्याने तपास राज्य गुन्हे अन्वेषण विभाग (सीआयडी)कडे देण्यासाठी पत्रव्यवहार केला आहे. दोन दिवसांत हा तपास त्यांचेकडे वर्ग होईल. (प्रतिनिधी)
तपास ‘ईडी’कडे द्या : शिवसेना
वारणानगर येथील नऊ कोटी १८ लाख रकमेच्या चोरीप्रकरणी सांगली पोलिसांवर गुन्हा दाखल झाला आहे, परंतु नेमकी किती रक्कम चोरीला गेली हे गुलदस्त्यातच आहे. त्यामुळे या प्रकरणाचे मूळ शोधण्यासाठी याचा तपास इन्फोर्समेंट डिपार्टमेंट (ईडी)मार्फत करावा, अशी मागणी शिवसेनेच्या शिष्टमंडळाने सोमवारी कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.

Web Title: 'Those' police frozen bank accounts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.