उदयनराजेंच्या विजयी मिरवणुकीत सोनसाखळ्या चोरणारे अटकेत

By दत्ता यादव | Published: June 26, 2024 10:00 PM2024-06-26T22:00:51+5:302024-06-26T22:01:04+5:30

तब्बल २९ तोळे सोने हस्तगत; अहमदनगरमधून घेतले ताब्यात

Those who stole gold chains in Udayanraj's victory procession were arrested | उदयनराजेंच्या विजयी मिरवणुकीत सोनसाखळ्या चोरणारे अटकेत

उदयनराजेंच्या विजयी मिरवणुकीत सोनसाखळ्या चोरणारे अटकेत

सातारा: खासदार उदयनराजे भोसले यांच्या विजयी मिरवणुकीत सोन्याच्या साखळ्या चोरल्याप्रकरणी पाचजणांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. त्यांच्याकडून चार गुन्ह्यांतील २९ तोळे सोने हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले.

बाबासाहेब महादेव गायकवाड (रा. वेळी, ता. पाथर्डी, जि. अहमदनगर), रामदास सोमनाथ घुले (रा. माळेगाव चकला, ता. शिरूर, जि. बीड), सचिन काळू पवार (रा. आनंदनगर, ता. पाथर्डी, जि. अहमदनगर), नितीन शिवाजी धोत्रे (रा. नाथनगर, ता. पाथर्डी, जि. अहमदनगर), अर्जुन लक्ष्मण मासाळकर (रा. वाळुंज, ता. पाथर्डी, जि. अहमदनगर), अशी पोलिसांनी अटक केलेल्यांची नावे आहेत.

उदयनराजे भोसले यांच्या विजयी मिरवणुकीत एका व्यक्तीची साडेतीन तोळे सोन्याची साखळी चोरीला गेली होती. तसेच आणखी व्यक्तींच्या सोनसाखळ्या ही चोरीला गेल्या होत्या. या गुन्ह्यांचा तपास तातडीने करण्याचे निर्देश पोलिस अधीक्षक समीर शेख यांनी स्थानिक गुन्हे शाखेला दिले होते. त्यानुसार पोलिस निरीक्षक अरुण देवकर यांनी सहायक पोलिस निरीक्षक रोहित फार्णे व उपनिरीक्षक विश्वास शिंगाडे यांच्या नेतृत्वाखाली एक पथक तयार केले होते.

तपासादरम्यान संशयितांनी हा गुन्हा केला असल्याची माहिती पथकाला मिळाली. त्यानुसार पोलिसांच्या पथकाने अहमदनगर येथे जाऊन संशयितांना अटक केली. त्यांच्याकडून सातारा शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील तीन व फलटण शहरच्या हद्दीतील एक असे एकूण चार गुन्हे उघडकीस आले.  या गुन्ह्यातील २० लाख ६६ हजार रुपये किमतीचे २८.७ तोळे सोन्याचे दागिणे, १२ हजारांची रोकड तसेच गुन्ह्यात वापरलेली जीप, असा एकूण २७ लाख ७८ हजारांचा ऐवज पोलिसांनी जप्त केला. 

पोलिस निरीक्षक अरुण देवकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक अमित पाटील, अंमलदार अतिश घाडगे, संतोष सपकाळ, संजय शिर्के, विजय कांबळे, सचिन साळुंखे, लैलेश फडतरे, अजित कर्णे, अमित सपकाळ, शरद बेबले, प्रवीण फडतरे, अमित माने आदींनी या कारवाईत भाग घेतला.   

Web Title: Those who stole gold chains in Udayanraj's victory procession were arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.