विस्तवाला हात लावणाऱ्यांना चटका काय असतो तो दिसेल, अंबादास दानवे यांचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2024 01:59 PM2024-01-22T13:59:56+5:302024-01-22T14:00:17+5:30
मुख्यमंत्र्यांनी छ. शिवरायांची शपथ घेतलीय
सातारा : सातारा असो किंवा महाराष्ट्र, शिवसेना आपल्या पद्धतीने काम करत आहे. विस्तवाला ज्यांनी हात लावला तर त्याला कसा चटका बसतो हे आगामी काळात दिसून येईल, असा इशारा शिवसेना ठाकरे गटाचे विरोधी पक्षनेते आ. अंबादास दानवे यांनी दिला.
कोरेगाव येथे बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. या शर्यतीच्या उद्घाटनास आले असताना शासकीय विश्रामगृह येथे पत्रकारांशी ते बोलत होते. यावेळी शिवसेना उपनेते प्रा. नितीन बानुगडे-पाटील, जिल्हाप्रमुख सचिन मोहिते, हर्षल कदम आदी पदाधिकारी उपस्थित होते.
दानवे म्हणाले, फडणवीस यांना कारसेवक असल्याचा पुरावा सादर करावा लागतोय यातच आमचे यश आहे. बाबरी मशीद पाडल्यानंतर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी सांगितले होते की, बाबरी मशीद जमीनदोस्त शिवसैनिकांनी केली त्याचा सार्थ अभिमान आहे.
शिवसेनेतील फुटीनंतर जिल्ह्यातील परिस्थितीबाबत प्रश्न विचारला असता आ. दानवे म्हणाले, शिवसेना पक्ष फिनिक्स पक्ष आहे. थोडीशी फुंकर घातली जी विस्तव होतो. अन् विस्तवाला कोणी हात लावला तर त्याला कसा चटका बसतो हे आगामी काळात दिसेल.
आ. दानवे पुढे म्हणाले, बैलगाडा शर्यत ग्रामीण भागातील मातीतील खेळ, उत्सव आहे. प्रत्येक ठिकाणी हा उत्सव वेगवेगळ्या प्रकारे पार पडत असतो. साताऱ्यातील बैलगाडा शर्यत ही वेगळीच ओळख आहे.
मुख्यमंत्र्यांनी छ. शिवरायांची शपथ घेतलीय
जरांगे-पाटलांनी मराठा आरक्षणासाठी पुन्हा नेत्यांना गावबंदी करण्याचा इशारा दिला आहे, त्यावर आ. दानवे म्हणाले, मराठा आरक्षणासाठी सरकारने वारंवार तारीख पे तारीख दिली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतली आहे. त्यामुळे जरांगे-पाटलांची मागणी पूर्ण झाली पाहिजे. त्यासाठी अनेक मार्ग आहेत. केंद्रातील आणि राज्यातील सरकारला आरक्षण प्रश्न सोडवायचा नसून जाती जातीत भांडणे लावायची असल्याचे त्यांनी सांगितले.