‘त्या’ महिला पोलिसाचा निवडणूक आयोगाकडून गौरव

By admin | Published: February 17, 2017 10:39 PM2017-02-17T22:39:07+5:302017-02-17T22:43:02+5:30

प्रशस्ती पत्रक : पालिका निवडणुकीवेळी मतदान केंद्रावर चरेगावकरांसोबत झटापट

'Those' women's policemen are honored by the Election Commission | ‘त्या’ महिला पोलिसाचा निवडणूक आयोगाकडून गौरव

‘त्या’ महिला पोलिसाचा निवडणूक आयोगाकडून गौरव

Next

म्हसवड : कऱ्हाड नगरपालिका निवडणुकीत मतदार केंद्रावर आलेले राज्य सहकारी परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर यांना एका महिला कॉन्स्टेबलने रोखले होते. त्यानंतर झालेल्या वादावादीची चित्रफीत सोशल मीडियावर व्हायरल झाली. त्यात एका महिला कर्मचाऱ्याच्या धाडसाचं कौतुकच झालं. आता राज्य निवडणूक आयोगानंही याची दखल घेऊन शाबासकी देणारे पत्र पाठविले आहे.
याबाबत माहिती अशी की, सातारा जिल्ह्यातील पालिकांसाठी २७ नोव्हेंबरला मतदान झाले. मतदानावेळी कऱ्हाड येथील एका मतदान केंद्रात राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर आपली गाडी घेऊन जात होते. त्यावेळी त्या मतदान केंद्रावर कर्तव्य बजावत असलेल्या व कऱ्हाड शहर पोलिस ठाण्यात कामास असलेल्या व मूळच्या माण तालुक्यातील पळशी येथील असलेल्या महिला पोलिस कॉन्स्टेबल दया अर्जुन डोईफोडे यांनी चक्क चरेगावकर यांना मतदान केंद्रात जाण्यापासून अडवलं.
त्यावेळी चरेगावकर ऐकण्याच्या तयारीत नव्हते. वास्तविक पाहता मतदान केंद्राच्या शंभर मीटरच्या आत वाहन नेण्यास मनाई असते. मात्र, ‘मी मंत्री आहे, माझ्या गाडीला निवडणूक आयोगाच्या परवानगीचा परवाना लावण्यात आला आहे,’ असा दावा चरेगावकर यांनी केला होता. मात्र, महिला पोलिस कॉन्स्टेबल डी. ए. डोईफोडे या नियम समजावून सांगत होत्या. पण त्यांचं कुणीही ऐकून घ्यायला तयार नव्हतं. उपस्थित अधिकाऱ्यांनीही कानाडोळा केला होता.
या घटनेचे व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर, हे प्रकरण मीडियाने उचलून धरले. यानंतर निवडणूक आयोगाने या प्रकरणाची दखल घेऊन, महिला पोलिस कॉन्स्टेबल डोईफोडे यांना राज्य निवडणूक आयोगाचे मुख्य सचिव डॉ. एस. एम. चन्ने यांनी एक पत्र पाठवून कर्तव्य दक्षतेबाबत कौतुक केलं आहे. आता सोशल मीडियावरून हे पत्रही व्हायरल होत आहे. यामुळे माण तालुक्यात सर्वत्र याचीच चर्चा रंगत आहे. (प्रतिनिधी)


कऱ्हाड पालिका निवडणुकीत मी केवळ माझे कर्तव्य पार पाडले. त्यानंतर कोणाचाही त्रास झाला नाही. परंतु त्यानंतर सोशल मीडिया अन् आता राज्य निवडणूक आयोगानं माझ्या कामाची दखल घेऊन कौतुक केलं. याचा आनंद वाटतो.
- दया डोईफोडे, महिला पोलिस कॉन्स्टेबल, कऱ्हाड पोलिस ठाणे

Web Title: 'Those' women's policemen are honored by the Election Commission

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.