पालखी सोहळा रद्द तरी दर्शनाची हुरहूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2021 04:24 AM2021-07-12T04:24:54+5:302021-07-12T04:24:54+5:30
फलटण : फलटणकरांना आस लागलेला श्री संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा कोरोनामुळे यंदाही रद्द झाला आहे. सलग दुसऱ्या वर्षी ...
फलटण : फलटणकरांना आस लागलेला श्री संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा कोरोनामुळे यंदाही रद्द झाला आहे. सलग दुसऱ्या वर्षी फलटणकर पालखी सोहळ्याला मुकले असले तरी येथील भाविकांच्या मनात माऊलींच्या दर्शनाची हुरहूर मात्र कायम आहे.
ऐतिहासिक परंपरा लाभलेल्या फलटणला महानुभाव आणि जैन समाजाची दक्षिण काशी म्हणूनही ओळखले जाते. ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याला येथे विशेष महत्त्व आहे. ज्येष्ठ महिन्यातील पेरण्या उरकल्यानंतर वारकऱ्यांना वेध लागतात विठुरायाच्या दर्शनाचे. विठुरायाच्या चरणावर माथा टेकवण्याची वाट हा वारकरी वर्षभर पाहत असतो. ध्यानी मनी विठ्ठल वसलेल्या वारकऱ्यांच्या वाटेत यंदा कोरोना उभा आहे. जगावर कोरोनाचं सावट आहे. आपला देश, आपला महाराष्ट्र या कोरोनाच्या सावटातून सुटला नाही. रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढतेय. गर्दीमुळे अनेक सोहळे रद्द करण्यात आले. तसाच वारीचा पालखी सोहळाही रद्द करण्यात आला आहे.
पांडुरंगाच्या दर्शनाची लागलेली ओढ, ज्ञानोबा माऊली तुकाराम व विठुरायाचा जयघोष आणि टाळ-मृदुंगाच्या गजरात पंढरीकडे निघालेला लाखो वैष्णवांचा मेळा तिथीप्रमाणे सोमवारी ऐतिहासिक फलटण नगरीत मुक्कामासाठी येणार होता. यावेळी फलटणकरांनी भक्तिमय वातावरणात लाडक्या ज्ञानेश्वर माऊलींचे स्वागत करण्याचे ठरवले होते. मात्र, सर्वांचा भ्रमनिरास झाला आहे. यावर्षी माऊलींचे आगमन न झाल्याने फलटणची रामनगरी सुनीसुनी वाटत आहे. फलटण नगरीत दुसऱ्यांदा वैष्णवांचा महासागर नसणार आहे. पुढच्या वर्षी तरी कोरोनाचे सावट दूर होऊन सोहळा व्हावा, अशी मनोमन प्रार्थना भाविक करत आहेत.