कोरेगाव, खटाव तालुक्यांत हजारो एकर क्षेत्र पाण्याखाली येणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2021 04:54 AM2021-02-25T04:54:32+5:302021-02-25T04:54:32+5:30
कोरेगाव : ‘कोरेगाव तालुक्याचा पाणीप्रश्न सोडविण्याचा केलेला निर्धार आता पूर्ण होत असून, सिमेंट आणि कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यांची कामे मार्गी ...
कोरेगाव : ‘कोरेगाव तालुक्याचा पाणीप्रश्न सोडविण्याचा केलेला निर्धार
आता पूर्ण होत असून, सिमेंट आणि कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यांची कामे
मार्गी लागली आहेत. जलसंधारण आणि मृदसंधारण विभागाने कामाची निविदा
प्रक्रिया सुरू केली आहे. हजारो एकर क्षेत्र पाण्याखाली आणण्यासाठी तब्बल १६ कोटी ७९ लाखांचा निधी मंजूर झाला आहे’, अशी माहिती राष्ट्रवादी
काँग्रेस पक्षाचे मुख्य प्रतोद आमदार शशिकांत शिंदे यांनी दिली.
कोरेगाव आणि खटाव तालुक्याचा पाणीप्रश्न मार्गी लावण्यासाठी
जिहे-कठापूरसह वसना-वांगना जलसिंचन योजना मार्गी लावल्या आहेत.
त्याचबरोबर दोन्ही तालुक्यांतील प्रमुख नद्या आणि ओढ्यांवर बंधारे बांधून
पाणी अडविणे आवश्यक होते. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची वाढती मागणी
लक्षात घेऊन औरंगाबादच्या महाराष्ट्र जलसंधारण महामंडळाला प्रस्ताव सादर
करण्यात आले होते. त्यानुसार, १६ कोटी ७९ लाख रुपये सिमेंट आणि कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यांसाठी मंजूर करण्यात आले आहेत.
कोरेगाव तालुक्यात भाडळे, कवडेवाडी, मध्वापूरवाडी, पळशी, पाडळी,
बाबाचीवाडी, बोधेवाडी, धुमाळवाडी, गोडसेवाडी, कठापूर, भोसे, कुमठे,
चिमणगाव, सांगवी, कोरेगाव, भाकरवाडी, तडवळे संमत कोरेगाव, जांब बुद्रुक,
बोबडेवाडी, चांदवडी, ल्हासुर्णे, शिरढोण, जळगाव, कुमठे व अंबवडे या गावांमध्ये शेतकऱ्यांच्या मागणीप्रमाणे बंधारे मंजूर करण्यात आले आहेत.
खटाव तालुक्यात मोळ, मांजरवाडी, ललगुण, अनपटवाडी या गावांचा समावेश आहे.
जलसंधारण आणि मृदसंधारण विभागाने कामाची निविदा प्रक्रिया सुरू केली आहे.
मतदारसंघातील विकासकामांसाठी मी प्रयत्नशील असून, भविष्यातदेखील विविध
योजनांच्या माध्यमातून विकासकामे मार्गी लावली जाणार आहेत, असेही आ. शिंदे यांनी निदर्शनास आणून दिले.