भिमसेन-कुंती उत्सवास हजारोंची उपस्थिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2017 04:12 PM2017-09-07T16:12:46+5:302017-09-07T16:16:53+5:30
तारळे येथील ग्रामदैवत भिमसेन कुंती यात्रा गुरूवारी मोठ्या उत्साहात व भक्तीमय वातावरणात पार पडली. दोन्ही मुर्तींचे तारळी नदीत विसर्जन करण्यात आले. ‘भिमसेन महाराज की जय, कुंती माता की जय’च्या घोषात तारळेनगरी दुमदुमली. यावेळी विभागातील हजारो भाविक उपस्थित होते
तारळे : येथील ग्रामदैवत भिमसेन कुंती यात्रा गुरूवारी मोठ्या उत्साहात व भक्तीमय वातावरणात पार पडली. दोन्ही मुर्तींचे तारळी नदीत विसर्जन करण्यात आले. ‘भिमसेन महाराज की जय, कुंती माता की जय’च्या घोषात तारळेनगरी दुमदुमली. यावेळी विभागातील हजारो भाविक उपस्थित होते
.
शेकडो वर्षाची परंपरा असलेली यात्रा आजही पारंपारीक पद्धतीने साजरी केली जाते. नागपंचमीच्या मुहूर्तावर भिमसेन सभामंडपात कुंभार बांधवांकडून सुमारे दहा फुट उंचीची मातीची मुर्ती बनविण्यास प्रारंभ केला जातो. तर कुंभारवाड्यात शाडुपासून तीन फुट उंचीची कुंती मातेची मुर्ती बनविण्यास सुरूवात होते. भिमसेन मुर्ती बनविल्यानंतर त्यावर भिमसेन मंडळाकडून वस्त्र, नक्षिकाम, अलंकार, फेटा बसवून मुर्ती सुशोभित व आकर्षक केली जाते.
गणेश चतुर्थीपुर्वी कुंती मातेची मुर्ती सभामंडपात आणली जाते. त्यानंतर अखंड विणा, भजन तसेच दररोज महाआरतीला सुरूवात होते. त्यानंतर दोन दिवस यात्रा संपन्न होते. बुधवारी, दि. ६ सकाळपासुन विविध अध्यात्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
रात्री दहा वाजण्याच्या सुमारास जाधव आळीतील मानाचे उदबत्तीचे झाड ढोल ताशाच्या गजरात आणी गुलालाची उधळण करीत सभा मंडपाजवळ आणण्यात आले. यावेळी फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली. त्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम झाला. यंदा महेश कारंडे यांनी महाप्रसादाचा खर्च केला.
गुरूवारी यात्रेचा मुख्य दिवस होता. सकाळपासुनच ग्रामस्थांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. सकाळी लवकरच कुंती मातेचा रथ मिरवणुकीने भिमसेन मंडपाजवळ आणण्यात आला. त्याठिकाणी भाविकांनी मोठ्या प्रमाणावर गुलालाची उधळण केली. पुढे कुंतीमातेचा रथ आणि त्यामागे भिमसेन रथाची मिरवणूक निघाली. बाजारपेठ, चांदणी चौक, मुख्य रस्त्याने मिरवणूक तारळी नदीपर्यंत आणण्यात आली. यावेळी रस्त्याच्या दुतर्फा भाविकांनी गर्दी केली होती.
कडक पोलीस बंदोबस्त तैनात
भिम-कुंती उत्सवाचा नयनरम्य सोहळा पाहण्यासाठी हजारो भाविकांनी गर्दी केली होती. गावात मिठाईच्या दुकानांचीही रेलचेल होती. यात्रा काळात अनुचित प्रकार घडू नये, यासाठी कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. पोलीस निरीक्षक जोतीराम गुंजवटे, उपनिरीक्षक एम. के. आवळे यांच्यासह अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते.