हजारो पक्ष्यांचे डोंगरदऱ्यांत वास्तव्य : कोयना, चांदोली अभयारण्यात वावर; पक्षी अभ्यासक नोंदवताय निरीक्षणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2018 08:49 PM2018-08-24T20:49:51+5:302018-08-24T20:50:45+5:30
कऱ्हाड : सिमेंटच्या जंगलात दररोज ठराविक पक्षी पाहायला मिळतात. खाद्याच्या शोधात हे पक्षी इतरत्र वावरतानाही आपण पाहतो; पण आपल्या अवतीभवती वावरणाऱ्या पक्षांबरोबरच वेगवेगळे शेकडो प्रजातींचे पक्षी
कऱ्हाड : सिमेंटच्या जंगलात दररोज ठराविक पक्षी पाहायला मिळतात. खाद्याच्या शोधात हे पक्षी इतरत्र वावरतानाही आपण पाहतो; पण आपल्या अवतीभवती वावरणाऱ्या पक्षांबरोबरच वेगवेगळे शेकडो प्रजातींचे पक्षी ‘सह्याद्री’च्या खऱ्याखुऱ्या जंगलात घरटी करून स्वच्छंदी राहतायत. पक्षीप्रेमींनी केलेल्या निरीक्षणांमध्ये सह्याद्री प्रकल्पाच्या डोंगरदºयांत पाचशेहून जास्त प्रजातींच्या हजारो पक्ष्यांचे वास्तव्य आहे.
कऱ्हाडला नोव्हेंबर महिन्यात पक्षीमित्र साहित्य संमेलन होत आहे. त्या पार्श्वभूमीवर कºहाड, पाटण तालुक्यातील पाणथळ ठिकाणांसह सह्याद्री प्रकल्पात आढळणाºया पक्ष्यांचा उहापोह केला असता सह्याद्रीच्या कुशीत तब्बल पाचशे प्रजातीचे पक्षी आढळून येत असल्याचे समोर आले आहे. पश्चिम घाटामध्ये सस्तन प्राण्यांच्या ४००, पक्ष्यांच्या २७५ व सरपटणाºया प्राण्यांच्या ६० प्रजातींची यापूर्वीच नोंद झाली आहे. पश्चिम घाट पर्वतरांगांच्या याच अद्वितीय वैश्विक मूल्यांची जाणीव झाल्याने युनेस्कोने २०१२ मध्ये त्यांच्या निकषाप्रमाणे पश्चिम घाट जागतिक नैसर्गिक वारसास्थळ म्हणून घोषित केले आहे.
महाराष्ट्रात पश्चिम घाट हा सह्याद्री पर्वत म्हणून ओळखला जातो.
कोयना अभयारण्य ही पश्चिम घाटाची उत्तरेकडील सरहद्द असून, येथील सदाहरित वनांमुळे मोठ्या प्रमाणात जैवविविधिता आढळून येते. त्यातच येथे सह्याद्री व्याघ्र प्रकल्प निर्माण करण्यात आला आहे. येथील नैसर्गिक साधनसंपत्तीमुळे प्रकल्पासाठी पोषक वातावरण असून, येथे पर्यटनाच्यादृष्टीने नवनवीन उपाययोजना करण्यासाठीही प्रयत्न सुरू आहेत. येथील सदाहरित वने पक्ष्यांसाठी पर्वणी ठरताना दिसत आहेत.
पक्षीमित्र रोहन भाटे सांगतात की, कोयना अभयारण्य, चांदोली तसेच सह्याद्रीच्या रांगा शेकडो प्रजातीमधील पक्षांचे आश्रयस्थान बनल्या आहेत. या पक्षांच्या निरीक्षणाचे व त्यांच्या नोंदी घेण्याचे काम पक्षी अभ्यासक करत आहेत. सह्याद्रींमध्ये सुमारे पाचशे प्रजातींचे हजारो पक्षी आहेत. त्यापैकी सुमारे २७५ प्रजातींची नोंद सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात करण्यात आली असून, जगात फक्त पश्चिम घाटात आढळणाºया पक्ष्यांच्या २८ जातींपैकी १३ जातीच्या पक्ष्यांची नोंद एकट्या सह्याद्री प्रकल्पात करण्यात आली आहे. त्यामध्ये वृक्ष कबूतर (निलगिरी वुडपिजन), मलबारी पोपट, मलबारी चंडोल, राखी डोक्याचा बुलबूल, तांबूस सातभाई, पांढºया पोटाचा नाचरा, निलगिरी फुलटोचा, छोटा शिंजीर, किरमिजी शिंजीर, मलबारी धनेश, मलबारी मैना, करड्या छातीचे हरेल, मलबार वुड श्राईक या पक्ष्यांचा समावेश आहे.
दुर्मीळ ‘राजधनेश’चा वावर
मोठा धनेश (राजधनेश) हा पक्षी दुर्र्मीळ मानला जातो. सध्या या पक्ष्याचे अस्तित्व धोक्यात आहे. मात्र, हा पक्षीही कोयना अभयारण्यात पाहायला मिळतो. हा पक्षी समृद्धीचे प्रतीक मानला जातो. बहुतांश वनांतून हा पक्षी हद्दपार झाला असून, कोयना अभयारण्यातील त्याचा वावर समाधानकारकच मानावा लागेल.
बेटावर नदीसुरय पक्ष्यांचा थवा
कोयनेच्या जलाशयात पाण्याची पातळी कमी झाली की बेट तयार होतात. पाली, जुंगटी, मालदेव यादरम्यान काही बेट आहेत. या बेटांवर नदीसुरय (रिव्हर टर्न) हे पक्षी असंख्य प्रमाणात येतात आणि जमिनीवर घरटी करतात. तेथेच ते अंडी घालतात. तसेच त्या बेटावर नदीसुरय पक्ष्यांचे मोठ्या प्रमाणात प्रजनन होते. ज्याठिकाणी या पक्ष्याचे वास्तव्य असते. तो परिसर बेटावर असल्याने तेथे त्यांना नैसर्गिक सुरक्षितता मिळते.
स्थलांतरित गरुडांचीही नोंद
‘पांढºया पोटाचा सागरी गरूड’ हा मोठमोठे जलाशय असलेल्या ठिकाणी पाहायला मिळतो. या सागरी गरुडाचे कोयना अभायरण्यातही दर्शन होते. स्थलांतर करून हा पक्षी काही कालावधीसाठी कोयना अभयारण्यात येतो. अभयारण्यात तो काहीकाळ वास्तव्य करतो. तसेच ‘आॅस्प्रे’ हा पक्षीही स्थलांतरित होऊन येथे येतो. त्याला ‘मिनखाई गरूड’ असेही म्हणतात. मासेमारीत पटाईत असलेला हा पक्षी सध्या कोयना आणि चांदोली अभयारण्यात मोठ्या प्रमाणावर आढळतोय.
शिकारी पक्ष्यांचा वावर अधोरेखित
तुरेवाले सर्पगरूड, व्याध, पांढऱ्या डोळ्याचा बाज हे शिकारी पक्षी आहेत. तांबट, सुतारपक्षी, धोबी, बुलबूल, खंड्या, धनेश, रातवा, पोपट, घुबड्यांच्या सहा ते प्रजाती असे असंख्य पक्षी कोयनेत पाहायला मिळतात.
कस्तूर, बुलबूल, शामा अन् बरंच काही...
पर्णपक्षी, मलबारी कस्तूर, नारंगी डोक्याचा कस्तूर, हळदी बुलबूल, शामा, गप्पीदास, दयाळ, कृष्ण कस्तूर, भारतीय दयाळ, टिकेलचा निळा माशिमार, स्वर्गीय नर्तक, पांढºया पोटाचा निळा माशीमार, ग्रेटटीट, फुलटोचा, चष्मेवाला, सूर्यपक्षी, पिवळ्या कंठाची चिमणी, हळद्या, कोतवाल, पहाडी कोतवाल, रॅकेट टेल्ड ड्रोंगो, हुदहूद, नीळकंठ, वेडा राघू, पट्टेरी पिंगळा, ठिपकेवाला पिंगळा, मत्स्यघुबड, गव्हाणी घुबड, भारतीय मोठे शृंगी घुबड, खंड्या, रातवा या पक्ष्यांचे कोयना अभयारण्य तसेच सह्याद्रीच्या रांगांमध्ये मोठ्या प्रमाणात वास्तव्य आहे.