भेदरलेल्या मुला-मुलींना खाकीचा आधार!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2017 12:05 AM2017-12-01T00:05:46+5:302017-12-01T00:09:28+5:30
खंडाळा : खंडाळा, खंबाटकी घाट आणि अपघात हे समीकरण काही नवे नाही. खंबाटकी बोगदा ओलांडल्यानंतरच्या वळणावर बुधवारी रात्री खासगी बससह चार वाहनांच्या झालेल्या अपघाताने पुन्हा एकदा खंबाटकी घाट भेदरला. रात्रीच्या अंधारात भयग्रस्त झालेल्या शालेय विद्यार्थ्यांना मात्र खंडाळा पोलिसांनी आधार दिला. या अपघातात पुन्हा एकदा खाकी वर्दीतील माणुसकी मदतीला धावून आली.
खंबाटकी घाटाने अनेक अपघात रात्री-अपरात्री पाहिले आहेत. खरंतर अशा वेळी अपघातग्रस्त प्रवाशांची परिस्थिती बिकट होत असते; पण प्रत्येकवेळी खंडाळ्यातील तरुणाई, पोलिस कर्मचारी व सामाजिक कार्यकर्ते मदतीला धावून जातात. बुधवारच्या अपघातात रात्रीच्या अंधाराने विद्यार्थी व त्यांच्यासोबत आलेले नातेवाईक घाबरले होते. अपघाताची माहिती कळताच खंडाळा पोलिस आपल्या सहकाºयांसह घाटात पोहोचले. जखमींना तत्काळ उपचारासाठी खंडाळा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. परंतु जखमींसह सोबत असणाºया इतर प्रवाशांना रात्र कुठे घालवावी, असा प्रश्न होता. पारगाव येथील विराज हॉलमध्ये सर्व प्रवाशांची निवासाची सोय करण्यात आली. खासगी वाहनाने खंडाळा येथून पारगावला विराज कार्यालयात सर्वांना पोहोचविले. हॉलमधील गाद्या, सतरंज्या, चादर अशा बिछाना कपड्यांची सोय करून थंडीपासून संरक्षणाची खबरदारी घेण्यात आली.
सकाळी खंडाळा पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक युवराज हांडे व अपघातावेळी नेहमीच मदतीसाठी अग्रेसर असणारे सामाजिक कार्यकर्ते युवराज ढमाळ हे आपल्या कार्यकर्त्यांसह कार्यालयात पोहोचले. सर्वांची चहा, बिस्किट व नाष्ट्याची सोय स्वखर्चाने केली. त्यामुळे अपघातग्रस्तांना आधार मिळाला. खंडाळा पोलिसांनी आपल्या नियमित कामासोबत माणसांप्रती जागविलेली माणुसकी निश्चितच कौतुकास्पद होती. सतत कोणत्याही कामात कठोर भूमिका घेणारे पोलिसांमध्ये माणुसकीचा झरा ओसंडून वाहत होता. केवळ तात्पुरती मदतच नव्हे तर या अपघातग्रस्तांना पुन्हा घरी पोहोचण्यासाठी खंडाळा येथून बसची सोय करून त्यांच्यासोबत पोलिस कर्मचारी देऊन पुणे रेल्वेस्टेशनपर्यंत पोहोचवले व इतर लागणारी मदतही अग्रेसर राहून केली.
अन् मुले सावरली..
खंबाटकी घाटात होणाºया अपघातात या अगोदरही पोलिसांनी मदत केली आहे. मात्र खंडाळा पोलिस स्टेशनला नव्याने कार्यभार सांभाळलेल्या युवराज हांडे यांनी आपले कसब दाखवत सर्वांना मदतीचे तसेच वाहतूक सुरळीत करण्याचे योग्य नियोजन केले. त्यांच्यातील खाकी वर्दीतील माणुसकी गुरुवारी खंडाळकरांना अनुभवायला मिळाली. त्यामुळे अपघातग्रस्त दु:खात आणि भयभीत अवस्थेतही सावरले. मुलांच्या पालकांमधूनही खंडाळा पोलिसांचे कौतुक होत आहे.