गोरेंच्या उपोषणाला हजारोंची ‘भाऊ’गर्दी !

By Admin | Published: January 18, 2016 11:00 PM2016-01-18T23:00:25+5:302016-01-18T23:34:15+5:30

जिल्हा बँकेवर हलगी मोर्चा : पात्रता नसलेल्या दोन राजेंमुळे संस्था अडचणीत येण्याचा इशारा

Thousands of 'brother' gardeen fasting for goren! | गोरेंच्या उपोषणाला हजारोंची ‘भाऊ’गर्दी !

गोरेंच्या उपोषणाला हजारोंची ‘भाऊ’गर्दी !

googlenewsNext

सातारा : जिल्हा मध्यवर्ती बँकेतील चुकीच्या कार्यपद्धतीवर आक्षेप घेत बँकेचे संचालक आ. जयकुमार गोरे यांनी सोमवारी साताऱ्यात हजारो शेतकऱ्यांसह भव्य मोर्चा काढला. जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन सादर केल्यानंतर आ. गोरे यांनी बँकेचे अध्यक्ष आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले व संचालक विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांच्यावर गंभीर आरोप करून बँकेच्या प्रशासकीय इमारतीसमोर बेमुदत उपोषण सुरू केले.
या आंदोलनामध्ये माण, खटाव व फलटण या दुष्काळी तालुक्यांतील शेतकरीवर्ग मोठ्या संख्येने सहभागी झाला होता. गोरे यांना पाठिंबा देण्यासाठी दुपारी बॉम्बे रेस्टॉरंट चौकातील उड्डाणपुलाखाली मोठ्या संख्येने शेतकरी जमा झाले होते. हातात तिरंगी झेंडे, डोक्यावर घातलेल्या गांधी टोपीवर ‘एकच भाव, जया भाव, लढाई आमच्या हक्काची,’ असे लिहिलेले कार्यकर्ते मोठ्याने घोषणाबाजी करत होते.
या ठिकाणी आंदोलक शेतकऱ्यांची मोठी गर्दी झाल्याने तब्बल एक तास वाहतुकीचा खोळंबा झाला होता. दुपारी सव्वाएकच्या सुमारास मोर्चाला सुरुवात झाली. गजीनृत्य, ढोल-ताशांचा गजर, सनईचा आवाज अशा वातावरणात बॉम्बे रेस्टॉरंट चौकातून मोर्चाला सुरुवात झाली. आ. जयकुमार गोरे, फलटणचे रणजितसिंह नाईक-निंबाळकर, अंकुश गोरे, संतोष जाधव, किरण बर्गे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाकडे कूच झाला. जिल्हा बँकेच्या प्रशासकीय इमारतीसह जिल्हाधिकारी कार्यालयाचे प्रवेशद्वार बंद करण्यात आले होते. दोन्ही ठिकाणी प्रचंड पोलीस फौजफाटा उभा करण्यात आला होता. जिल्हा बँकेच्या मुख्य प्रवेशद्वारांना तर कुलूप लावण्यात आले होते. जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवेंद्रसिंहराजे भोसले, उपाध्यक्ष सुनील माने, संचालक लक्ष्मणराव पाटील, नितीन पाटील, राजेश पाटील, अनिल देसाई, दादाराजे खर्डेकर, प्रकाश बडेकर, प्रदीप विधाते आदी यावेळी बँकेत तळ ठोकून होते.
जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन आ. गोरे जिल्हा बँकेच्या प्रशासकीय कार्यालयाबाहेर दाखल झाले. यावेळी पोलीस निरीक्षक राजीव मुठाणे व त्यांच्या पोलीस सहकाऱ्यांनी आ. गोरे यांना रोखल्याने गोरेंची पोलिसांशी हमरी-तुमरी झाली. ‘मी बँकेचा संचालक आहे, मला कोणीही बँकेत जाण्यापासून रोखू शकत नाही,’ अशी भूमिका आ. गोरे यांनी घेतल्याने पोलिसांनी आ. गोरे यांच्यासह रणजितसिंह नाईक-निंबाळकर, अंकुश गोरे, किरण बर्गे, संतोष जाधव यांना गेट उघडून आत सोडण्यात आले.
आ. गोरे यांनी जिल्हा बँकेच्या बाहेरील दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून पुतळ्याच्या चौथऱ्यावर काही काळ ठिय्या मांडला. आ. गोरे याचठिकाणी उपोषण सुरू करणार, असा अंदाज बांधला जात होता; पण पोलिसांच्या विनंतीवरून ते उठले. दरम्यान, याचवेळी बँकेचे अध्यक्ष आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले व इतर संचालक त्यांना भेटायला आले. आ. गोरे यांनी आपल्या मागण्यांचे निवेदन त्यांच्याकडे सादर केले. दरम्यान, यावेळी शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्याशी हास्यविनोदही झाले.
निवेदन सादर करून बँकेच्या समोर उभारलेल्या मंडपातील व्यासपीठावर येऊन उपस्थित हजारो शेतकऱ्यांसमोर आ. गोरे यांनी आपली भूमिका मांडून विधान परिषद सभापती रामराजे नाईक-निंबाळकर व आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले. ‘विधान परिषद सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी मालोजीराजे सहकारी बँक व श्रीराम कारखाना अडचणीत आणला, तर आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी अजिंक्यतारा सहकारी बँक व सूतगिरणी अडचणीत आणली. याच पात्रतेवर हे दोघे जिल्हा बँकेच्या कार्यकारिणी समितीवर राहून काम करणार असतील, तर जिल्हा मध्यवर्ती बँकही अडचणीत यायला वेळ लागणार नाही,’ अशी सडेतोड टीका आ. जयकुमार गोरे यांनी यावेळी केली.
दरम्यान, आ. गोरे यांच्या आरोपांचे आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले व राष्ट्रवादीच्या इतर संचालकांनी पत्रकार परिषद घेऊन खंडन केले. तसेच आ. गोरे हे सवंग लोकप्रियतेसाठी हा उपद्व्याप करत असल्याची टीकाही त्यांनी केली.


शिवेंद्रसिंहराजेंनी फुकट ज्ञान पाजळू नये!
‘आ. गोरे यांनी प्रसिद्धीची स्टंटबाजी करण्यापेक्षा न्याय मार्गांचा वापर करावा,’ असा सल्ला आ. शिवेंद्रसिंहराजेंनी दिल्यानंतर पत्रकारांशी बोलताना आ. गोरे म्हणाले, ‘बँकेचा कारभार कशा पद्धतीने चाललाय, हे लोकांसमोर यावा, यासाठी उपोषणाचा मार्ग स्वीकारला आहे. जनतेच्या न्याय मागणीसाठी मला काय करायला लागेल, हे मला चांगले समजते. शिवेंद्रसिंहराजेंनी फुकट ज्ञान पाजळू नये. मी स्टंटबाजी करण्यासाठी उपोषण करत नाही, तर प्राण गेला तरी बेहत्तर, अशी माझी इर्षा आहे.’


रामराजेंच्या पात्रतेविषयीही वक्तव्य
‘राज्याचे वरिष्ठ सभागृह असणाऱ्या विधान परिषदेचे रामराजे हे सभापती आहेत. मात्र, या पदाच्या गरिमेनुसार ते वागत नाहीत. त्यामुळे एखाद्या पंचायत समितीचे सभापती होण्याचीही त्यांची पात्रता नाही,’ अशी जहरी टीका आ. गोरे यांनी केली.

Web Title: Thousands of 'brother' gardeen fasting for goren!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.