एका वातीने पेटविले दुकानातील हजारो फटाके
By admin | Published: October 25, 2014 11:51 PM2014-10-25T23:51:16+5:302014-10-25T23:51:16+5:30
ग्रामस्थांची धावपळ : ओंडमध्ये स्टॉल जळून खाक
उंडाळे : ओंड, ता. कऱ्हाड येथे लक्ष्मीपूजनानंतर मुलांनी लावलेल्या फटाक्याच्या माळेतील एक फटाका स्टॉलमध्ये जाऊन पडल्यामुळे एकाचवेळी हजारो फटाके फुटले. यावेळी लागलेल्या आगीत स्टॉल पूर्णपणे जळून खाक झाला. गुरुवारी, दि. २३ रात्री ७ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, ओंड येथे बसथांब्यालगत परिसरातील तीन ते चार युवकांनी भागीदारीत एक फटाका स्टॉल उभारला होता. गत दहा दिवसांपासून या स्टॉलवरून फटाक्यांची विक्री केली जात होती. लहान मुलांसह युवकही याठिकाणी फटाके खरेदी करण्यासाठी येत होते. संबंधित स्टॉलवर सुतळी बॉम्बसह, रॉकेट, भुईचक्र, फुलबाजे, झाड यासह इतर फटाक्यांचे बॉक्स मोठ्या प्रमाणावर होते. लक्ष्मीपूजनादिवशी सकाळपासूनच या स्टॉलवर खरेदीसाठी गर्दी होते. सायंकाळी लक्ष्मीपूजनाचा मुहूर्त होता. त्यामुळे संबंधित फटाका स्टॉल परिसरात असलेल्या व्यावसायिकांनी लक्ष्मीपूजन आटोपल्यानंतर फटाक्यांची माळ लावली. फटाके वाजत असतानाच एक फटाका उडून स्टॉलमध्ये पडला. त्यामुळे तेथील काही फटाक्यांनी पेट घेतला. हा प्रकार निदर्शनास येऊन काही हालचाली करेपर्यंतच इतर फटाके फुटू लागले. त्यामुळे त्याठिकाणी उपस्थित असणाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली. एकाचवेळी शेकडो फटाके फुटत होते. त्यामुळे मोठा गोंधळ निर्माण झाला होता. भुईचक्रांचे बॉक्स जमिनीवरच पेटत होते, तर रॉकेट बॉक्समधून बाहेर पडून इतरत्र जात होते. सुतळी बॉम्बही मोठ्या आवाजात फुटत होते. लहान मोठ्या फटाक्यांच्या माळाही वाजत होत्या. त्याठिकाणी जाणेही धोक्याचे बनले होते. या दुर्घटनेत स्टॉलधारक युवकांचे एक ते दीड लाखाचे नुकसान झाले आहे. घटनेची नोंद पोलिसांत झाली नव्हती. (वार्ताहर)
युवकांचे प्रसंगावधान
फटाके फुटत असताना व आग भडकली असताना गावातील काही युवकांनी धाडस करून आग विझविण्यासाठी प्रयत्न सुरू केले. मिळेल तेथून पाणी आणून ते युवक आग विझविण्यासाठी धडपडत होते. अखेर तासाभराने सर्व फटाके फुटल्यानंतर आग विझविण्यात युवकांना यश आले.