बिदालला पाण्यासाठी झटतायत हजारो हात

By Admin | Published: April 5, 2017 11:25 PM2017-04-05T23:25:28+5:302017-04-05T23:25:28+5:30

दुष्काळमुक्तीसाठी लढा : लोकसहभागातून उभारला लूज बोल्डर

Thousands of hands have been struggling for water | बिदालला पाण्यासाठी झटतायत हजारो हात

बिदालला पाण्यासाठी झटतायत हजारो हात

googlenewsNext



दहिवडी : ‘कावळ्या कावळ्या पाणी आण चिमणे चिमणे कोट कर’ या उक्तीप्रमाणे संपूर्ण बिदालकर आता पाण्यासाठी एकवटले आहेत. सर्व राजकीय मतभेद बाजूला सारून दुष्काळाशी दोन हात करण्यासाठी ग्रामस्थांसह प्रशासकीय अधिकारीही दिवसरात्र झटत आहेत. गावातील सुमारे दोनशे ग्रामस्थांनी श्रमदानातून लूज बोल्डर उभारला आहे.
वॉटर कप स्पर्धेत महाराष्ट्रातील ३० तालुक्यांतील २ हजार ६७ गावे सहभागी झाली आहेत. माण तालुक्यातील ३२ गावांनी यामध्ये सहभाग घेतला आहे. या स्पर्धेत उतरलेल्या गावांनी वॉटर कप जिंकायचाच या हेतूने कामाला गती दिली आहे. ही स्पर्धा ८ एप्रिल ते २२ मे या कालावधीत होणार असली तरी प्रत्येक गावाने कामाचा आराखडा तयार केला आहे. ठिकठिकाणी ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले आहे.
प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे, तहसीलदार सुरेखा माने, गटविकास अधिकारी सांगवे, कृषी अधिकारी राजेश जानकर, पाणी समन्वयक अजित पवार, डॉ. प्रदीप पोळ यांच्या मार्गदर्शनाखाली गावामध्ये माती परीक्षण, शोष खड्डे, नाडेप, आगकाडी मुक्त शिवार यांची कामे सुरू आहेत. वॉटर कप स्पर्धेतील सहभागी गावात सर्वात मोठे गाव बिदाल असून, गावकऱ्यांचा उत्साह वाढविण्यासाठी सिनेअभिनेते ९ एप्रिलला बिदाल गावात भेट देणार आहे.
बिदाल ग्रामस्थांनी दुष्काळावर मात करण्याचा निर्धार केला असून, दुष्काळमुक्तीसाठी सुरू असलेली कामे प्रगतिपथावर सुरू आहे. कामाची रोजची माहिती मिळावी व लोकसहभाग वाढावा यासाठी वाड्या-वस्त्यांवर जाऊन ग्रामस्थांना माहिती दिली जात आहे. (प्रतिनिधी)
अनेकांकडून मदतीचा हात..
बिदाल गावामध्ये पाणी फाउंडेशनचे कार्यालय सुरू करण्यात आले आहे. यामार्फत दररोज कामाचे नियोजन केले जात आहे. गावामध्ये प्रत्येक कामासाठी कमिट्या नेमल्या आहेत. गावाचे क्षेत्रफळ २५०० हेक्टर असल्याने पाणी अडवण्यासाठी किमान ५० लाख रुपये जमा करावे लागणार आहेत. यासाठी मुंबईकर, पुणेकर, सातारकर, फलटणकर यांच्यासह शिक्षक, दानशूर व्यक्ती, बागायतदार, व्यापारी आदींकडून देणगी दिली जात आहे. गावची एकी पाहता गोपूज कारखान्याचे अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांनी ५ लाख, मोती काका सराफ बारामती २ लाख, संजय गांधी १ लाख यांच्यासह अनेकांनी मदत केली आहे. सोमनाथ भोसले यांच्या नेतृत्वाखाली निधीचे संकलन केले जात आहे.

Web Title: Thousands of hands have been struggling for water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.