किसन वीर’कडून तेरा लाखांची मदत

By admin | Published: October 18, 2016 12:48 AM2016-10-18T00:48:46+5:302016-10-18T00:48:46+5:30

वारसांना धनादेश दिला : पाटखळ येथील मारुती शिंदे यांचा अपघाती मृत्यू

Thousands of help from Kisan Veer | किसन वीर’कडून तेरा लाखांची मदत

किसन वीर’कडून तेरा लाखांची मदत

Next

भुर्इंज : येथील किसन वीर सातारा सहकारी साखर कारखान्याच्या सहवीज निर्मिती प्रकल्प विभागात दुर्दैवी घटना घडून अपघाती मृत्यू झालेल्या पाटखळ, ता. सातारा येथील मारुती कृष्णा शिंदे यांच्या वारसांना कारखान्याच्या वतीने एकूण तेरा लाख सव्वीस हजार एकशे नव्याण्णव रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली. त्यापैकी पाच लाख बावन्न हजार दोनशे ब्याण्णव रुपयांचा धनादेश त्यांची पत्नी वर्षा शिंदे यांच्याकडे कारखान्याचे संचालक चंद्रकांत इंगवले यांच्या हस्ते व अन्य संचालक, कारखान्याचे अधिकारी, कर्मचारी व पाटखळ ग्रामस्थांच्या उपस्थितीत सुपूर्द करण्यात आला.
याबाबत शिंदे कुटुंबीय व उपस्थित ग्रामस्थांना माहिती देताना कारखान्याचे एचआर मॅनेजर अरविंद शिंगटे म्हणाले, ‘मारुती शिंदे यांचे दोन महिन्यांपूर्वी कारखान्यात अपघाती निधन झाले होते. सभासद आणि कारखान्याचे कर्मचारी केंद्रबिंदू मानून काम करणारे कारखान्याचे अध्यक्ष मदन भोसले यांनी शिंदे यांच्या मृत्यू पश्चात त्यांच्या कुटुंबीयांची आर्थिक ओढाताण होऊ नये यासाठी कायद्यानुसार आणि सामाजिक बांधिलकीतून सर्व ती आर्थिक मदत लवकरात लवकर करण्याची ग्वाही शिंदे कुटुंबीयांना दिलेली होती. त्यानुसार कारखान्याने नुकसान भरपाईची रक्कम सात लाख त्र्याहत्तर हजार नऊशे सात रुपये कामगार न्यायालयात भरलेली असून, ही रक्कम शिंदे कुटुंबीयांना न्यायालयामार्फत मिळणार आहे. त्याचबरोबर समूह जनता अपघात विमा, कर्मचारी अपघात विमा, कामगार सेवक कल्याण निधी आणि कारखान्यातील कर्मचाऱ्यांनी स्वइच्छेने त्यांच्या पगारातून केलेली मदत अशी एकूण पाच लाख बावन्न हजार दोनशे ब्याण्णव रुपयांचा धनादेश मारुती शिंदे यांच्या वारसांना देण्यात आलेला आहे. कारखान्याचे संचालक मंडळ, अधिकारी व कर्मचारी शिंदे कुटुंबीयांच्या पाठीशी असून, व्यवस्थापन भविष्यात त्यांना आवश्यक सहकार्य करेल.’
यावेळी कारखान्याचे संचालक प्रकाश पवार-पाटील, विजया साबळे, माजी संचालक नंदाभाऊ जाधव, अ‍ॅड. धनंजय चव्हाण, कार्यकारी संचालक ए. बी. जाधव, जयवंत साबळे, फायनान्स मॅनेजर टी. जी. पवार, एच. आर. मॅनेजर ए. टी. शिंगटे, चीफ इंजिनिअर आर. बी. जगदाळे, अ‍ॅग्री मॅनेजर एस. जे. कदम, को-जनरेशन इन्चार्ज डी. आर. वाघोले, मुख्य शेती अधिकारी विठ्ठलराव कदम, रमेश नलवडे, प्राजक्ता शिंदे, प्रसाद शिंदे, अशोक शिंदे, दत्तात्रय शिंदे, राजाराम शिंदे, वसंत डिगे, विनोद शिंदे, विश्वास शिंदे, गणपत शिंदे, मयूर शिंदे, सतीश शिंदे, भरत शिंदे, शरद शिंदे आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
 

Web Title: Thousands of help from Kisan Veer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.