एकवीस दिवसांत तीन हजार हरकती
By admin | Published: December 30, 2015 09:31 PM2015-12-30T21:31:27+5:302015-12-31T00:20:20+5:30
नागरिकांच्या पालिकेत रांगा : वसुली विभागाच्या कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी असल्यामुळे नागरिकांचे होतायत हाल : मुदत वाढविण्याची मागणी
सातारा : करवाढी विरोधात हरकती नोंदविण्यासाठी नागरिकांकडून अपील करण्यात येत आहे. गेल्या एकवीस दिवसांत तब्बल तीन हजार हरकती पालिकेत दाखल झाल्या आहेत. नागरिकांची गर्दी वाढत आहे. परंतु पालिकेत कर्मचाऱ्यांचा तुटवडा असल्यामुळे नागरिकांना रांगेमध्ये बराचवेळ ताटकळत उभे राहावे लागत आहे.
सातारा नगर पालिकेने दोन महिन्यांपूर्वी चतुर्थ वार्षिक पाहणी पूर्ण केल्यानंतर डिसेंबर महिन्यात करवाढी विरोधात हरकती नोंदविण्याचे अपील करण्यात आले होते. हरकतींना प्रारंभ झाल्यानंतर डिसेंबरचा महिना संपण्याच्या मार्गावर असतानाच हरकती नोंदविण्यासाठी पालिकेत नागरिकांनी तुडूंब गर्दी केली. परंतु वसुली विभागाच्या कर्मचाऱ्यांची संख्या कमी असल्याने नागरिकांना रांगेमध्ये ताटकळत उभे राहावे लागले.
दर वर्षी चार वर्षांनी करपट्टीत वाढ करण्यात येते. २०११ नंतर आता करवाढ करण्यात येणार असून, सर्रास ३० टक्के करवाढीचा प्रस्ताव नगररचना विभागाने पाठविला आहे. यावर ही करवाढ अमान्य असल्यास यावर हरकती नोंदविण्यासाठी वसुली विभागाने नागरिकांना नोटीस दिल्या आहेत. दि. ७ डिसेंबर रोजी हरकती दाखल करण्यास प्रारंभ झाला.
मात्र सुरुवातीला नागरिकांची पालिकेत गर्दी कमी होती. गेले पाच दिवस सलग सुट्या असल्यामुळे पालिकेत कोणीच फिरकत नव्हते. परंतु आता सुट्या संपल्याने नागरिकांची प्रचंड गर्दी केली. गेल्या एकवीस दिवसांच्या कालावधीत सुमारे तीन हजार हरकती दाखल झाल्या असून, यावर अंतिम निर्णय अपील समिती घेणार आहे. शहरातील अनेक भागामध्ये पालिकेकडून अद्याप नोटीसा गेल्या नाहीत. त्यामुळे अपिलाची मुदत वाढवून द्यावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. चतुर्थ वार्षिक पाहणी झोन तयार करण्यात वसुली विभागाचे कर्मचारी व्यस्त असल्याने या हरकतीमुळे त्यांच्या रोजच्या कामावर आणखीन ताण पडला आहे. त्यातच पालिकेतून ३१ डिसेंबर पूर्वी सेवानिवृत्त होणाऱ्यांची संख्या २० हून अधिक असल्याने इतर कर्मचाऱ्यांवर कामाचा बोजा पडणार आहे. यंदाची ३० टक्के दरवाढ कोणालाच मान्य नाही. त्यामुळे जेवढ्या मिळकती आहेत. तेवढ्या हरकती पालिकेत दाखल होण्याची शक्यता आहे. असे वसुली विभागाच्या कर्मचाऱ्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
जेवणाचं गाठोड पालिकेत !
गेल्या काही दिवसांपासून हरकती दाखल करण्यासाठी पालिकेत नागरिकांची गर्दी वाढत आहे. एक हरकती दाखल करण्यासाठी सुमारे पाच ते दहा मिनिटे वेळ लागत आहे. त्यामुळे रांगेत बराचवेळ ताटकळत उभे राहावे लागते. आदल्या दिवशी ज्या लोकांना याचा अनुभव आला. त्या लोकांकडून माहिती घेऊन दुसरे येणारे नागरिक पालिकेत घरातून येताना जेवणाचा डबा घेऊनच येत आहेत. रांगेत उभे राहून भूक लागत आहे. त्यामुळे आधी जेवण नंतर काम, असे नागरिकांचे म्हणणे आहे.
कारण काय लिहू
अनेकजणांना केवळ घरपट्टी वाढली आहे, याचाच संताप झाला आहे. हरकती अर्जावर काय लिहायचे, हे अनेकांना माहितीही नाही. रांगेत उभ्या राहिलेल्यांना अर्जात काय लिहू असे विचारले जात आहे.