Satara: वणव्याच्या भडक्याने मान्याचीवाडी येथील हजारो हेक्टर क्षेत्र खाक, गावाच्या दिशेने झेपावणारा वणवा ग्रामस्थांनी रोखला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2025 14:21 IST2025-03-07T14:21:02+5:302025-03-07T14:21:21+5:30

देशी प्रजातीच्या झाडांबरोबर औषधी वनस्पतींचीही मोठी हानी

Thousands of hectares of land in Manyachiwadi were burnt due to the fire in satara | Satara: वणव्याच्या भडक्याने मान्याचीवाडी येथील हजारो हेक्टर क्षेत्र खाक, गावाच्या दिशेने झेपावणारा वणवा ग्रामस्थांनी रोखला

Satara: वणव्याच्या भडक्याने मान्याचीवाडी येथील हजारो हेक्टर क्षेत्र खाक, गावाच्या दिशेने झेपावणारा वणवा ग्रामस्थांनी रोखला

ढेबेवाडी : अज्ञाताने लावलेल्या वणव्याचा भडका उडाल्याने पाटण तालुक्यातील मान्याचीवाडी येथील शेकडो एकर क्षेत्र जळून खाक झाले. तर तब्बल पाच तास मान्याचीवाडी येथील नागरिकांनी आगीशी संघर्ष करून नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला, यामुळेच गावाच्या दिशेने झेपावणारी आग थोपवण्यात यश आले; मात्र तोपर्यंत हजारो झाडे होरपळल्याने मोठे नुकसान झाले.

ढेबेवाडी विभागातील डोंगररांगांमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून अज्ञातांकडून वणवा लावण्याचे प्रकार घडत आहेत. यामुळे डोंगराच्या बाजूला असणाऱ्या अनेक गावांना याची झळ पोहोचत आहे. दोन दिवसांपूर्वी मस्करवाडी या ठिकाणी डोंगरात लावलेला वणवा आंब्याच्या बागेमध्ये घुसल्याने सुमारे दीड हजार झाडे होरपळली. त्याचबरोबर या विभागात असलेले डोंगर परिसरातील वनविभागाचे हजारो हेक्टर क्षेत्रातील वनसंपत्तीचे वणव्यामुळे नुकसान झाले आहे. यामध्ये देशी प्रजातीच्या झाडांबरोबर औषधी वनस्पतींचीही मोठी हानी झाली आहे.

मान्याचीवाडीनजीकच्या शिवारात गुरुवारी दुपारच्या सुमारास वणवा लागल्याचे येथील नागरिकांच्या निदर्शनास आले. दुपारच्या सुमारास लागलेल्या या वणव्याचा भलताच भडका उडाला. हा-हा म्हणता संपूर्ण शिवारात वणवा पसरला. यामध्ये शिवारात असलेला चारा तसेच पिकांचेही मोठे नुकसान झाले तर शिवारात असलेल्या आंबा, चिकू त्याचबरोबर देशी प्रजातीच्या झाडांचेही होरपळून मोठे नुकसान झाले. शिवारामध्ये असलेले चाऱ्याचे गवत सुकलेले असल्याने वणव्याचा मोठा भडका उडाला.

प्रचंड वेगाने गावाचे दिशेने झेपावत असलेल्या वणव्याला येथील महिला पुरुषांसह तरुणांनी थोपविण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी घरातून त्याचबरोबर काही बोअरवेलच्या माध्यमातून पाणी उपसून या वणव्यावर मात करण्याचा तब्बल पाच तास प्रयत्न केला. यावेळी संपूर्ण गावाच्या दिशेने झेपावणारा वणवा पाच तासांनंतर थोपवण्यात ग्रामस्थांना यश आले.

Web Title: Thousands of hectares of land in Manyachiwadi were burnt due to the fire in satara

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.