कास धरणावर शेकडो वाहनांच्या ताफ्यासह हजारो पर्यटकांचा बहर!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2023 10:40 PM2023-07-12T22:40:22+5:302023-07-12T22:40:31+5:30
जागतिक वारसा स्थळांच्या यादीत स्थान पटकावलेल्या कास पठार, कास धरणाला शनिवार, रविवार दोन दिवशी पर्यटकांचा बहर वाढत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
पेट्री : यवतेश्वर, कास, एकीव, भांबवलीला पर्यटकांची तोबा गर्दी होत आहे. मनमोहक निसर्गाचे सौंदर्य खुणावत असल्याने मंगळवार, शनिवार, रविवार सलग सुट्टीत पर्यटक मोठ्या संख्येने कास तलावाला भेट देत आहेत.
जागतिक वारसा स्थळांच्या यादीत स्थान पटकावलेल्या कास पठार, कास धरणाला शनिवार, रविवार दोन दिवशी पर्यटकांचा बहर वाढत आहे. सलगच्या सुट्टीत कास परिसरात पर्यटक मोठ्या प्रमाणावर गर्दी करत असून, रिमझिम पावसात भिजण्याबरोबरच पर्यटक कौटुंबिक सहलीचे क्षण कॅमेऱ्यात टिपतानाचे चित्र आहे. चारचाकी, दुचाकीच्या मोठ्या प्रमाणावर रांगा लागत आहेत.
कास तलावावर पर्यटक गर्दी करत जलविहाराचा आनंद लुटत असून, कित्येक पर्यटक सेल्फीस्टीकद्वारे फोटोसेशन करण्यात मग्न होत आहेत. बालचमूही आनंद लुटतानाचे चित्र असून, काहीजण चालू गाडीतून निसर्गाचे सौंदर्य शूटिंग करत आहेत. या मार्गावर ठिकठिकाणी तरुणाई रस्त्यावर संगीताचा ठेका धरत नृत्य करत आहे.
वर्षा पर्यटनाला लाखो पर्यटक कास परिसराला भेट देत असतात. कास परिसरात पर्यटनास आलेले पर्यटक येथील गुलाबी थंडीत, रिमझिम पावसात गरमागरम खरपूस मक्याच्या कणसांवर ताव मारणे पसंत करत असून, ठिकठिकाणी गरमागरम कणसे खाण्यासाठी पर्यटकांची गर्दी होत आहे.
काही तरुणाई चालू वाहनावर उभे राहणे, वाहने धरणाच्या पाण्यापर्यंत नेणे, सांडव्याच्या ठिकाणी खोलवर डोकावून पाहणे, मुख्य वाॅल्व्हवर उभे राहून सेल्फी काढण्यात दंग होणे. यामुळे पाय घसरून एखादी विपरीत घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
-तुषार पवार, पर्यटक, सातारा