फलटण तालुक्‍यात सलग दुसऱ्या दिवशी हजारावर रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 04:28 AM2021-05-29T04:28:59+5:302021-05-29T04:28:59+5:30

सातारा : जिल्ह्यात शुक्रवारी २,५२८ नागरिकांचे कोरोना अहवाल पाॅझिटिव्ह आले असून, ३० बाधितांचा मृत्यू झाला. फलटण तालुक्यामध्ये सलग दुसऱ्या ...

Thousands of patients in Phaltan taluka for the second day in a row | फलटण तालुक्‍यात सलग दुसऱ्या दिवशी हजारावर रुग्ण

फलटण तालुक्‍यात सलग दुसऱ्या दिवशी हजारावर रुग्ण

Next

सातारा : जिल्ह्यात शुक्रवारी २,५२८ नागरिकांचे कोरोना अहवाल पाॅझिटिव्ह आले असून, ३० बाधितांचा मृत्यू झाला. फलटण तालुक्यामध्ये सलग दुसऱ्या दिवशी हजारांच्यावर बाधित सापडले असल्याने या तालुक्यात चिंतेचे वातावरण आहे.

सातारा तालुका रुग्णवाढीमध्ये सर्वात पुढे होता. आता मात्र फलटण तालुका विस्फोटकरित्या सर्वात पुढे गेला आहे. फलटण शहर, उपनगरे तसेच संपूर्ण तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणावर रुग्णसंख्या आढळून येत आहे. तालुक्यात गुरुवारी १ हजार ७१ इतके रुग्ण आढळले होते. दुसऱ्या दिवशीही रुग्णवाढीचा आलेख चढताच राहिला. फलटण तालुक्यामध्ये शुक्रवारी १ हजार २५३ नवे रुग्ण सापडल्याने फलटणमधील एकूण रुग्णसंख्या २४ हजार ३११ इतकी झाली आहे. तालुक्यातील कोरोनाबाधितांच्या मृत्यूची संख्याही २४५वर जाऊन पोहोचली आहे. फलटण तालुका कोरोनाचा हॉटस्पॉट बनल्याने प्रशासनापुढे यक्ष प्रश्न निर्माण झाला आहे. तालुक्यातील नागरिकांमध्येही भीतीचे वातावरण आहे.

सातारा, कऱ्हाड, माण, कोरेगाव या तालुक्यांमधील रुग्णसंख्या अजूनही १००च्या पुढेच आहे. सातारा तालुक्यात शुक्रवारी ३०८ रुग्ण आढळले. महाबळेश्वर आणि पाटण तालुक्यांमध्ये रुग्णसंख्या कमी होती, मात्र याठिकाणीही रुग्णांची वाढ होताना दिसत आहे. कोरोनामुळे जिल्ह्यात आतापर्यंत ३ हजार ५९२ लोकांना जीव गमवावा लागला आहे.

जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या १ लाख ६० हजार ५५४ इतकी झाली आहे. जिल्ह्यातील विविध कोरोना रुग्णालये व गृह अलगीकरणामध्ये २१ हजार ८८९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यामध्ये शुक्रवारी १२ हजार ८३९ जणांची चाचणी करण्यात आली, त्यातून २,५२८ लोक बाधित आढळले. जिल्ह्यात रुग्णवाढीचा दर १९.७० टक्क्यांवर स्थिर आहे.

जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटर, डीसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या २ हजार ५३ नागरिकांना शुक्रवारी संध्याकाळपर्यंत घरी सोडण्यात आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.

चौकट...

सातारा तालुक्यातील मृत्यू हजारांच्या पुढे

सातारा तालुक्यात कोरोनामुळे शुक्रवारी १३ रुग्णांचा मृत्यू झाला. तालुक्यात गुरुवारपर्यंत ९९७ लोकांचा मृत्यू झाला होता. आता कोरोनामुळे मृत्यूमुखी पडलेल्या रुग्णांची संख्या १ हजार १० इतकी झाली आहे.

चौकट....

जिल्ह्यातील सर्वात जास्त रुग्ण सातारा तालुक्यात

सातारा तालुक्यात रुग्णवाढीचा दर कमी येत नाही. महिनाभरापासून तालुक्यामध्ये ५००च्यावर रुग्ण आढळत होते. त्यामुळे तालुक्यात रुग्णवाढ झपाट्याने झाली. गेल्या दोन दिवसांपासून तालुक्यात तीनशेच्यावर रुग्ण आढळत आहेत. तालुक्यातील कोरोनाबाधितांची संख्या ३४ हजार ४९८ इतकी झाली आहे. ही संख्या जिल्ह्यातील इतर तालुक्यांच्या तुलनेत सर्वाधिक आहे.

Web Title: Thousands of patients in Phaltan taluka for the second day in a row

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.