सह्याद्रीच्या घाटात धावली हजारो पावले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2017 01:07 AM2017-09-18T01:07:55+5:302017-09-18T01:07:59+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा/पेट्री : सातारा हिल मॅरेथॉन असोसिएशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या सहाव्या ‘हिल हाफ मॅरेथॉन २०१७’ स्पर्धेत यंदा सहा हजारांहून अधिक स्पर्धक धावले. यवतेश्वर डोंगराचा नागमोडी घाट अन् हिरव्या निसर्गाच्या साक्षीने देश-विदेशातील स्पर्धकांनी ही स्पर्धा यशस्वीरीत्या पूर्ण केली. स्पर्धेचे २१ किलोमीटर अंतर पूर्ण करताना आबालवृद्धांचा उत्साह जराही कमी झाला नाही.
या स्पर्धेत इथिओपियाच्या चला बेंगा याने २१ किलोमीटर अंतर अवघ्या १ तास ८ मिनिटे आणि २८ सेकंदात पूर्ण करून पुरुष खुल्या गटात प्रथम क्रमांक पटकविला. तर इथिओपियाच्याच झेवदितू वोर्की हिने १ तास २४ मिनिटे २० सेकंदात हे पूर्ण करून महिला गटात प्रथम येण्याचा बहुमान मिळविला.
पोलिस परेड मैदान ते प्रकृती हेल्थ रिसॉर्ट व पुन्हा पोलिस परेड मैदान अशी २१ किलोमीटर अंतराची ही स्पर्धा रविवारी (दि. १७) सकाळी सहा वाजता सुरू झाली. पोलिस परेड मैदानात कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील, जिल्हाधिकारी श्वेता सिंघल, पोलिस अधीक्षक संदीप पाटील, हिल मॅरेथॉन असोसिएशनचे संयोजक डॉ. प्रताप गोळे, डॉ. संदीप काटे व पदाधिकाºयांच्या उपस्थितीत स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले.
स्पर्र्धेसाठी सर्व विभागांनी जय्यत तयारी केली होती. स्पर्धकांना कोणताही अडथळा निर्माण होऊ नये, यासाठी स्पर्धेच्या मार्गावर चोख पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. जागोजागी आरोग्य पथकाच्या रुग्णवाहिकाही सज्ज होत्या. स्पर्धकांना प्रोत्साहन देण्यासाठी सातारकरांनी स्पर्धा मार्गावर दुतर्फा गर्दी केली होती.
पुरुष व महिलांच्या खुल्या गटात प्रथम तीन क्रमांक इथिओपियाच्या स्पर्धकांनी पटकविले. जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिकाचे वितरण करण्यात आले. प्रथम तीन क्रमाकांना अनुक्रमे दीड लाख, एक लाख व पन्नास हजार रुपयांचे पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.
यवतेश्वर घाटाचे
रुप बदलले...
स्पर्धकांच्या आगळ्या-वेगळ्या वेशभूषेमुळे यवतेश्वर घाटाला वेगळेच सौंदर्य आले होते. अनेकांनी हे चित्र आपल्या कॅमेºयात बंदिस्त केले. घाटातील निखळ झºयातील पाणी तोंडावर मारून स्पर्धक पुढे जात होते.
अधिकाºयांसह लोकप्रतिनिधीही धावले
कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील, जिल्हा पोलिस प्रमुख संदीप पाटील यांच्यासह आमदार शिवेंद्र्रसिंहराजे यांनी देखील हिल हाफ मॅरेथॉन स्पर्धेत सहभाग नोंदवून स्पर्धकांना प्रेरणा दिली. त्यांच्यासमवेत वेदांतिकाराजे भोसले याही स्पर्धेत सहभागी झाल्या.