हजारो विद्यार्थी मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्तीच्या प्रतीक्षेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2021 04:25 AM2021-06-30T04:25:30+5:302021-06-30T04:25:30+5:30
सातारा : कोरोनामुळे मागच्या वर्षी सर्व कनिष्ठ महाविद्यालये बंद असल्याने हजारो विद्यार्थ्यांना समाजकल्याण विभागाची शिष्यवृत्ती मिळू शकलेली नाही. विद्यार्थ्यांनी ...
सातारा : कोरोनामुळे मागच्या वर्षी सर्व कनिष्ठ महाविद्यालये बंद असल्याने हजारो विद्यार्थ्यांना समाजकल्याण विभागाची शिष्यवृत्ती मिळू शकलेली नाही. विद्यार्थ्यांनी ऑनलाइन अर्ज केले, मात्र महाविद्यालयाकडून समाजकल्याण विभागाला विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचे कागदपत्रच पुरविण्यात आले नसल्याने हजारो विद्यार्थ्यांचे अर्ज महाविद्यालयातच पडले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या हक्काच्या शिष्यवृत्तीपासून वंचित राहावे लागत आहे.
समाजकल्याण विभागातर्फे अनुसूचित जाती, ओबीसी, एसबीसी व व्हीजेएनटीच्या विद्यार्थ्यांना मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती देण्यात येते. समाजकल्याण विभागाद्वारे जिल्ह्यातील सुमारे ३५ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मंजूर करण्यात येते. त्यापैकी निम्म्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा पहिला हप्ता देण्यात आला आहे. उरलेले विद्यार्थी मात्र या शिष्यवृत्तीपासून वंचितच राहिले आहेत.
जिल्ह्यात २०२०-२१ मध्ये ओबीसी, एसबीसी, व्हीजेएनटीचे अर्ज प्राप्त झाले, त्यातील बहुतांश अर्ज महाविद्यालयांद्वारे मंजूर करण्यात आले. मात्र, महाविद्यालयाकडे अद्यापही अर्ज शिल्लक आहेत. समाजकल्याण विभागानेही प्राप्त अर्ज मंजूर केले आहेत. तांत्रिक त्रुटी आणि अपूर्ण माहिती पुरविल्यामुळे त्यातील काही अर्ज बाद करण्यात आले आहेत. विभागाद्वारे पात्र विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा पहिला हप्ता देण्यात आला. त्यानंतर कोविड वाढत गेले आणि हा हप्ता वितरित करण्यात अडथळे आल्याने विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहिले.
चौकट :
अनुसूचित जातीचे सर्वाधिक अर्ज
सातारा जिल्ह्यात २०२०-२०२१ मध्ये अनुसूचित जातीचे ५० हजारांहून अधिक अर्ज समाजकल्याण विभागाला प्राप्त झाले आहेत. कोविडची सुरुवात व्हायच्या आधीच यातील बहुतांश अर्ज महाविद्यालयांद्वारे स्वीकारण्यात आले. महाविद्यालयांकडे शिल्लक असलेले अर्ज समाजकल्याण विभागाद्वारे स्वीकारलेले काही अर्ज त्रुटी असल्याने रद्द करण्यात आले आहेत. नाकारण्यात आलेल्या अर्जांची संख्या शेकड्यांमध्ये आहे. हजाराहून अधिक अर्ज दुरुस्तीसाठी परत पाठविण्यात आले आहेत.
परिपूर्ण अर्ज भरण्याची गरज
विद्यार्थ्यांनी चुकीचा ऑनलाइन अर्ज भरल्यामुळे महाविद्यालयांमध्ये असे अर्ज पडून आहेत. त्यासाठी महाविद्यालयांना आवश्यक त्या सूचना केल्या आहेत. चुकीचे अर्ज सेंड बॅक टू स्टुडंट यावर परत करावे, ज्यामुळे विद्यार्थ्यांना त्रुटी दुरुस्त करता येतील. त्यासाठी अचूक अर्ज भरण्याची ३० जून शेवटची तारीख आहे.
- समाजकल्याण अधिकारी, सातारा
विद्यार्थी अडकले गावी
लॉकडाऊन लागल्यामुळे वर्षभरापासून महाविद्याल बंद आहे. परीक्षाही ऑनलाइन झाल्या. त्यामुळे शिष्यवृत्ती बँकेत जमा झाली की नाही हे माहिती नाही. शिष्यवृत्ती अर्जात त्रुटी निघाल्यामुळे तो महाविद्यालयातच पडून असल्याचे गेल्या महिन्यात समजले.
- शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी
लॉकडाऊनच्या काळातच शिष्यवृत्तीचा अर्ज ऑनलाइन भरला होता. त्यानंतर आम्हाला गावी जाणे भाग पडले. त्यानंतर यंदा फेब्रुवारी महिन्यात साताऱ्यात येऊन शिष्यवृत्तीबाबत चौकशी केली तेव्हा अर्ज चुकल्याची माहिती मिळाली, आता पुन्हा अर्जात दुरुस्ती करून तो भरून पाठविला आहे.
- शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी