सीतामाईच्या साक्षीनं हजारो सुवासिनींनी घेतला अखंड सौभाग्याचा वसा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2018 05:00 PM2018-01-14T17:00:05+5:302018-01-14T17:00:18+5:30
तीळ नव्हे हलवा, येता जाता बोलवा.., तीळ गूळ घ्या, गोड बोला, वसा घ्या वसा.. अखंड सौभाग्याचा वसा... अशा एक ना अनेक भावोद्गारांनी मंदिर परिसर दणाणून सोडला.
चाफळ (सातारा) : तीळ नव्हे हलवा, येता जाता बोलवा.., तीळ गूळ घ्या, गोड बोला, वसा घ्या वसा.. अखंड सौभाग्याचा वसा... अशा एक ना अनेक भावोद्गारांनी मंदिर परिसर दणाणून सोडला. समर्थ रामदास स्थापित पाटण तालुक्यातील चाफळ येथील श्रीराम मंदिरात रविवारी सीतामाईच्या साक्षीनं हजारो सुवासिनींनी अखंड सौभाग्याचा वसा घेतला.
तीर्थक्षेत्र चाफळ येथील श्रीराम मंदिरात १९८४ पासून सीतामाईची यात्रा भरवली जाते. या उत्सवास यंदा तीस वर्षे होत आहेत. मकरसंक्रांतीला सीतामाईचे दर्शन घेऊन वसा घेतल्यास सौभाग्य अखंड टिकते, अशी महिलांची श्रद्धा आहे. त्यामुळे या उत्सवास अनन्य साधारण महत्त्व आहे.
सीतामाई उत्सवासाठी रविवारी सकाळपासूनच मंदिर परिसरात महिलांनी गर्दी केली होती. दुपारी महिलांच्या संख्येत वाढ होत गेल्याने महिला मिळेल त्या ठिकाणी विडे मांडून पूजा करत होत्या. वसा घेत असताना महिला सुगडीमध्ये तीळ, गाजर, बोरे, गूळ, ऊस, शेंगा, हरभरा, पावटा, हळदी-कुंकू घेऊन श्रद्धापूर्वक सीतामाईच्या साक्षीने खाऊच्या पानावर खोबरे, खारीक, सुपारी ठेवून पाच सौभाग्यवतींच्या हातून ओटीत घालत होत्या. त्यामुळे मंदिर परिसरात सुगड्यांचा जागोजागी खच पडला होता.
सीतामाईचे दर्शन व्यवस्थित घेता यावे म्हणून श्रीराम मंदिर व्यवस्थापनाने बेरिगेटस उभारून व्यवस्था केली होती. यात्रेसाठी जिल्ह्यासह परजिल्ह्यातून एसटीची सोय केली होती. महिलांना दर्शनासाठी ओळीने मंदिरात सोडण्यासाठी समर्थ विद्या मंदिर विद्यालयाचे सुनील सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली आरएसपीचे विद्यार्थी-विद्यार्थिनी अथक परिश्रम घेत होते. अनुचित प्रकार घडू नये, यासाठी उंब्रजचे पोलिस निरीक्षक जोतिराम गुंजवटे यांच्या मार्गदर्शनासाठी शंभर कर्मचाºयांचा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.