६३ हजार पर्यटकांनी अनुभवला फुलोत्सव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 6, 2019 11:29 PM2019-10-06T23:29:44+5:302019-10-06T23:29:49+5:30
पेट्री : जागतिक वारसास्थळात समावेश झालेल्या कास पठारावर विविधरंगी फुलांचा हंगाम सुरू असल्याने देश-विदेशातील पर्यटकांची पावले कासकडे वळताना दिसत ...
पेट्री : जागतिक वारसास्थळात समावेश झालेल्या कास पठारावर विविधरंगी फुलांचा हंगाम सुरू असल्याने देश-विदेशातील पर्यटकांची पावले कासकडे वळताना दिसत आहेत. शनिवार, रविवार सलग सुटीच्या दिवशी पर्यटक मोठ्या संख्येने पुष्प पठाराला भेटी देत आहेत. दरम्यान, ६३ हजार पर्यटकांनी कास पुष्प पठार पाहण्यासाठी गर्दी केली होती.
गेल्या दीड महिन्यापासून विविध प्रजातींच्या रंगाचा अविष्कार कासवर पाहावयास मिळाला. या हंगामाचे शेवटचे काही दिवस राहिले आहेत. फुलांसाठी प्रसिद्ध असणाऱ्या पुष्प पठार कासवर या हंगामातील सर्वात शेवटची मिकीमाऊसची पिवळ्याधमक रंगांच्या छटेने पठार बहरले आहे.
आॅगस्ट मध्यानंतर कासवर विविध प्रजातींची फुले यायला सुरुवात होते. प्रथमत: पांढरे गेंद व निळी सीतेची आसवं या फुलांच्या गालिचाने पठार निळे, पांढरे भासत आहे. ही फुले चालू असतानाच गणपती उत्सवाच्या दरम्यान जांभळ्या तेरड्याचे मोठ्या प्रमाणात आगमन होते. सप्टेंबर महिन्यात तेरड्याचे गालिचे सर्वदूर दिसतात आणि पठाराला गालिचांचे स्वरूप प्राप्त होते.
पांढरे गेंद, निळी सीतेची आसवे व जांभळा तेरडा या फुलांच्या प्रचंड प्रमाणात येण्याने पठार अक्षरश: विविध रंगात न्हाऊन जातं. या मोठ्या प्रमाणात येणाºया फुलांबरोबर वायतुरा, चवर, पांढरी आमरी, कळलावी, पहाडवेल, धायटी, दगडी शेवाळ, झुंबर, जरतारी, भुईकारवी, विघ्नहर्ता, तुतारी, गौळण, भारंगी, पंद, दीपकांडी, अभाळी, नभाळी, कंदीलपुष्प, पाषाणी, ड्रॉसेरा ईडीका, ड्रॉसेरा बर्मानी आदी विविधरंगी फुलेही पठाराच्या सौंदर्यात भर घालत आहेत.
सर्वात शेवटचा रंगोत्सव आॅक्टोबर महिन्यात पठारावरील तेरडा, पांढरे गेंद व निळी सीतेची आसवं ही फुले जाऊन मिकीमाऊस म्हणजेच स्मितीया किंवा कावळा ही पिवळ्या रंगांची फुले पठारावर येतात. त्यांच्या जोडीला सोन्याच्या रंगाची पिवळ्या सोनकीचे सडे जागोजागी दिसतात. त्यामुळे पठार पिवळे धम्मक दिसत आहे. हा पिवळ्या रंगाचा सोहळा अजून आठ ते पंधरा दिवस चालण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
अजून पंधरा
दिवस हंगाम
यावर्षी कास पठार कार्यकारी समितीमार्फत सप्टेंबरपासून हंगामाची सुरुवात करण्यात आली. हंगामाच्या सुरुवातीपासून ६३ हजार पर्यटकांनी कास पठार पाहिले आहे. अजून पंधरा दिवस हंगाम चालू राहिल्यास हा
आकडा पंधरा ते वीस हजारांनी वाढणार आहे.