महापालिका बॉम्बने उडविण्याची धमकी
By admin | Published: February 23, 2016 12:41 AM2016-02-23T00:41:10+5:302016-02-23T00:41:10+5:30
दोन टपालांनी खळबळ : पत्रे संजयनगरमधून पाठविल्याचे स्पष्ट
सांगली : येत्या २८ फेब्रुवारी रोजी महापालिकेच्या सांगलीतील मुख्यालयाची इमारत बॉम्बने उडविण्याची तसेच शहरात अन्यत्र बॉम्बस्फोट घडविण्याची धमकी देणारी दोन वेगवेगळी पत्रे महापालिकेला सोमवारी प्राप्त झाल्याने खळबळ माजली आहे. या पत्रांवर संजयनगरचा पत्ता असून लष्कर-ए-तोयबा आणि संभाजी ब्रिगेड या संघटनांच्या नावांचा वापर यासाठी करण्यात आला आहे. महापालिकेने याबाबत जिल्हा पोलीसप्रमुखांकडे तक्रार केली आहे.
महापालिकेला गेल्या चार वर्षांत धमकीची एकूण सहा पत्रे प्राप्त झाली आहेत. सोमवारी तशीच पत्रे प्राप्त झाल्याने महापालिकेची डोकेदुखी वाढली आहे. या पत्रांवर संजयनगरचा पत्ता असल्याचे महापालिका अधिकाऱ्यांनी सांगितले. महापालिकेची इमारत उडविण्याबरोबरच शहरात अनेक ठिकाणी बॉम्बस्फोट घडविण्यात येणार असल्याचा उल्लेख पत्रात आहे.
दोन वेगवेगळ्या संघटनांची नावे टाकून ही पत्रे पाठविली असली तरी, दोन्ही पत्रांवरील हस्ताक्षर एकाच व्यक्तीचे आहे. त्यामुळे कुणीतरी खोडसाळपणे ही पत्रे पाठविल्याची चर्चा आहे. तरीही महापालिकेने या पत्रांबाबतची तक्रार जिल्हा पोलीसप्रमुख सुनील फुलारी यांच्याकडे केली आहे. पोलीस आता या पत्रांचा तपास करीत आहेत.
महापालिकेत ही पत्रे पोहोचताच खळबळ माजली. काहींनी या पत्रांवर विनोद केले, तर काहींनी या टपाल प्रकरणाचा छडा लागण्याची अपेक्षा व्यक्त केली. अशा पत्रांची डोकेदुखी कायमची बंद होण्याच्यादृष्टीने बंदोबस्त करावा, अशी मागणी महापालिका प्रशासनाने पोलीसप्रमुखांकडे केली आहे.