‘एअर पिस्टल’ दाखवून धमकी

By admin | Published: August 3, 2015 09:53 PM2015-08-03T21:53:43+5:302015-08-03T21:53:43+5:30

तिघांवर गुन्हा : नेले गावाजवळ अपघातानंतर तणाव

Threat by showing 'air pistol' | ‘एअर पिस्टल’ दाखवून धमकी

‘एअर पिस्टल’ दाखवून धमकी

Next

सातारा : अपघातानंतर बाचाबाची आणि मारहाण झाल्याने जमलेल्या मोठ्या जमावाला एकाने चक्क ‘एअर पिस्टल’ (छऱ्याची पिस्तूल) दाखवून धमकावल्याने त्याच्यासह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. सातारा तालुक्यातील नेले गावाजवळ सोमवारी सकाळी झालेल्या किरकोळ अपघातानंतर घडलेल्या या घटनेमुळे बराच वेळ तणावाचे वातावरण होते.नवनाथ अप्पा माने (मूळ रा. अनावळे, ता. सातारा, सध्या रा. नवी मुंबई), भीमराव जगन्नाथ कणसे आणि श्रीकांत रमेश कणसे (दोघे रा. कळंबे, ता. सातारा) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. यासंदर्भात सुमित बिभीषण मुळीक (वय २१, रा. सोनगाव, ता. सातारा) यांनी फिर्याद दाखल केली आहे. सोमवारी सकाळी नेले गावाजवळून ते आपले मामा गणेश शंकर जाधव यांच्यासह दुचाकीवरून (एमएच ११ बीएन ६३४०) निघाले होते. नेले बसथांब्याजवळ समोरून आलेल्या जीपशी (एमएच ४६ एएल ३७१८) दुचाकीची समोरासमोर धडक झाली. फिर्यादीच्या म्हणण्यानुसार जीप चुकीच्या बाजूने आल्यामुळे हा अपघात झाला.दरम्यान, अपघातानंतर जीप चालविणारा नवनाथ माने खाली उतरला आणि फिर्यादीला मारहाण केली. फिर्यादीने याबाबत फोनवरून नेले गावात माहिती दिली. तेथील काहीजण अपघातस्थळी धावले. मोठा जमाव जमल्याचे पाहून नवनाथ माने याने ‘एअर पिस्टल’ दाखवून धमकावले, असे फिर्यादीत म्हटले आहे. भीमराव माने याने लोखंडी गज घेऊन शिवीगाळ केली, तर श्रीकांत कणसे याने शिवीगाळ, दमदाटी केल्याचेही नमूद केले आहे. गावकऱ्यांनी या तिघांना पकडून ठेवले आणि पोलिसांना खबर दिली. सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. (प्रतिनिधी)


पोलिसांची धावाधाव
भांडणात पिस्तूल दाखविली गेल्याची माहिती कळताच पोलिसांची धावपळ उडाली. ग्रामपंचायत निवडणुकीच्या आदल्याच दिवशी हा प्रकार घडल्याने त्याचा संबंध निवडणुकीची असण्याची शक्यता पोलिसांना वाटली. त्या धास्तीने सातारा शहर, तालुका आणि शाहूपुरी या तीनही पोलीस ठाण्यांचे निरीक्षक घटनास्थळी धावले. तसेच अतिरिक्त पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांनीही घटनास्थळी जाऊन खातरजमा केली.

Web Title: Threat by showing 'air pistol'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.