खिळखिळी झालेली वाहनेही धावतायत गॅसवर !

By admin | Published: July 3, 2016 11:57 PM2016-07-03T23:57:32+5:302016-07-03T23:57:32+5:30

घरगुती गॅसचा सर्रास गैरवापर : कऱ्हाडात टोळी कार्यरत; पंपांवर शुकशुकाट; बेकायदा गॅस भरणाऱ्यांकडे रीघ

Threatened vehicles run on the gas! | खिळखिळी झालेली वाहनेही धावतायत गॅसवर !

खिळखिळी झालेली वाहनेही धावतायत गॅसवर !

Next

 कऱ्हाड : गॅसचा काळाबाजार सर्वपरिचित आहेच, परंतु त्यातूनच काहीजण स्वत:चे उखळ पांढरे करून घेण्याचा प्रयत्न करीत आहेत. घरगुती गॅसचा गैरवापर करण्याबरोबरच काहीजण सिलिंडरच्या टाक्यांचा साठा करीत असल्याचे निदर्शनास येत आहे. या टाक्यांचे बेकायदेशीररीत्या वितरणही होत आहे. शहरात अधिकृत गॅस पंप असूनही बेकायदेशीररीत्या गॅस भरणाऱ्यांकडे सध्या अनेक वाहनधारकांच्या रांगा लागत आहेत. अशा गॅस भरणाऱ्यांना साठेबाजांचे सहकार्य मिळत असल्याने हा व्यवसाय फोफावत असल्याचे चित्र आहे.
घरगुती गॅस वाहनांमध्ये भरण्याच्या उद्योगाला चालना देण्यासाठी काही स्थानिक युवकच सरसावले आहेत. या युवकांनी शहर परिसरात वाहनांमध्ये गॅस भरून देण्यासाठी यंत्रणा उभारली आहे. या यंत्रणेद्वारे या उद्योगाला बळकटी मिळत आहे. शहरात अधिकृतरीत्या गॅस भरूण देणारे पंप आहेत. याठिकाणी वाहनांमध्ये सुरक्षितरीत्या गॅस भरून दिला जातो. मात्र या पंपांवर नेहमी शुकशुकाटच जाणवतो. शहर व परिसरात गॅसवर चालणारी शेकडो वाहने असतानाही पंपांवर वाहने येत नसल्याने इतरत्र गॅस भरून दिला जात असल्याचे स्पष्ट होत आहे. शहरात काही ठिकाणी गॅस सिलिंडरच्या टाक्यांचा साठा केला जात आहे. या साठेबाजांना वितरकांकडूनही सहकार्य केले जात असण्याची शक्यता आहे. साठेबाज गॅस भरून देणाऱ्या टोळक्याला या टाक्यांचा पुरवठा करीत आहेत. त्याद्वारे संबंधितांकडून वाहनांमध्ये बेकायदेशीररीत्या गॅस भरून दिला जात आहे. मशीनद्वारे हा गॅस भरला जातो. त्यावेळी योग्य दक्षता न घेतल्याने अनर्थ घडण्याची शक्यताही नाकारता येत नाही. शहर व उपनगरात आडबाजूच्या ठिकाणी अनधिकृतपणे गॅस भरून देण्याचा हा उद्योग सुरू आहे. पंपावर आकारण्यात येणाऱ्या रक्कमेपेक्षा कमी खर्चात गॅस भरून दिला जात असल्याने अशा ठिकाणी वाहनांची सध्या रीघ लागत आहे. सध्या वाहनांची संख्या प्रचंड वाढली आहे. पेट्रोल तसेच डिझेलवर चालणाऱ्या हजारो कार रस्त्यावरून धावत आहेत.
डिझेल व पेट्रोलला पर्याय म्हणून वाहनांना अधिकृतरीत्या गॅसकीट बसवून देण्यात येते. संबंधित वाहनात गॅस पंपावरच गॅस टाकला जावा, अशी अपेक्षा असते. मात्र, तसे होताना दिसत नाही. बहुतांशजण पैसे वाचविण्यासाठी धोकादायकरीत्या वाहनात गॅस भरून घेत आहेत. अशा वाहनधारकांमध्ये कार व रिक्षा व्यावसायिकांचे प्रमाण जास्त आहे. स्थानिकांना अशी ठिकाणे माहिती असल्याने त्यांच्याकडून सर्रासपणे संबंधित ठिकाणी आपल्या वाहनात गॅस भरून घेतला जातो. शासन नियमाप्रमाणे वापराची मुदत संपलेली असूनही अनेक चारचाकी वाहने सध्या रस्त्यावरून धावत आहेत. या वाहनांतील प्रवास धोकादायक असला तरी अद्याप अशा वाहनांवर, वाहनमालकांवर कारवाई झालेली नाही. अशातच खिळखिळ्या बनलेल्या काही वाहनांना बेकायदेशीररीत्या गॅसकीट बसविण्यात आल्याचे दिसून येत आहे. या गॅसकीटमुळे अशा वाहनांतील प्रवास व ही वाहने धोकादायक बनली आहेत. (प्रतिनिधी)
परिवहन, पोलिसांकडून कारवाईची गरज...
गॅसचा काळाबाजार करून घरगुती सिलिंडरचा वाहनांसाठी वापर करणाऱ्या अशा टोळ्यांवर कारवाई होणे गरजेचे बनले आहे. त्यासाठी पोलिस व परिवहन विभागाने कडक धोरण अवलंबने गरजेचे आहे. वाहनांच्या गॅसकीटची व कागदपत्रांची तपासणी होणे गरजेचे आहे. त्यातून अनधिकृतपणे गॅस वापरणाऱ्या वाहनांवर कारवाई होऊन काही प्रमाणात का होईना, या बेकायदेशीर व्यवसायाला आळा बसण्यास मदत होईल. काही वर्षांपूर्वी कऱ्हाड शहर पोलिसांनी छापा टाकून वाहनात बेकायदा गॅस भरणाऱ्या टोळीचा छडा लावला होता. त्यावेळी संबंधितांवर कडक कारवाईही झाली होती. मात्र, त्यानंतर अद्याप अशी कारवाईच झाली नसल्याने बेकायदा गॅस भरणाऱ्यांचे फावले आहे.
वाहनांना अनधिकृत गॅसकीट बसविण्याबरोबरच गॅसही बेकायदेशीररीत्या भरीत आहेत. कीटसाठी घरगुती वापराच्या टाक्यांतील गॅस भरला जातो.
अनधिकृतरीत्या बसविलेले हे कीट धोकादायक बनत आहेत. या कीटमधून गॅसगळती होण्याची शक्यता जास्त असते.
वाहनाचे वायरिंग सुस्थितीत नसल्यास हा धोका दुपटीने वाढतो. धोकादायक गॅसकीट बसविलेल्या वाहनांमध्ये जीप व कारची संख्या जास्त आहे.
लांबपल्ल्याच्या प्रवासावेळी संबंधित कीट निकामी होण्याचा अथवा गॅसगळती होण्याचा संभव असतो. मात्र अशी वाहने सध्या रस्त्यावरून धावत आहेत.
महसूल विभागाने गॅसचा काळाबाजार करणाऱ्यांकडे दुर्लक्ष केले. वाहनांमधील गॅसकीटची तपासणी करण्याबाबत परिवहन विभाग व पोलसांनी उदासिनता बाळगली आहे. परिणामी हा व्यवसाय बळावला आहे.

Web Title: Threatened vehicles run on the gas!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.