खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी, फलटणमध्ये खासगी सावकाराविरोधात गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2022 02:15 PM2022-02-23T14:15:09+5:302022-02-23T14:18:25+5:30
पाच टक्के व्याज दराने दरमहा दहा हजार रुपये रक्कम नुसार आतापर्यंत सहा लाख रुपये मोहिते यास व्याजापोटी दिले
फलटण : खासगी सावकारीमधून लिहून घेतलेल्या जमिनीचा ताबा दिला नाही, म्हणून खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी देऊन शिवीगाळ करणाऱ्या खासगी सावकाराविरोधात फलटण शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत फलटण शहर पोलीस ठाण्यातून दिलेल्या माहितीनुसार, कैलास दादासाहेब मिंड (रा. टाकळवाडे ता. फलटण) यांनी २०१४ ते नोव्हेंबर २०२१ या कालावधीमध्ये फलटण येथील सोमवार पेठेतील खासगी सावकार भगवान नामदेव मोहिते यांच्याकडून भाचीच्या लग्नाकरिता पैशाची आवश्यकता असल्याने पैशाची मागणी केली होती.
खासगी सावकार भगवान मोहिते याने मिंड यांच्याकडून जमीन लिहून द्यावी लागेल असे म्हणून साठेखत व दस्त करून घेतला. त्याबदल्यात २ लाख १० हजार रुपये रोख रक्कम साठेखत दस्त व कूळ कायद्याच्या खर्चापोटी लावली होती. मिंड यांनी नोव्हेंबर २०२१ पर्यंत पाच टक्के व्याज दराने दरमहा दहा हजार रुपये रक्कम नुसार आतापर्यंत सहा लाख रुपये मोहिते यास व्याजापोटी दिले होते.
तरीसुद्धा जमिनीचा ताबा दिला नाही म्हणून खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी देऊन मोहिते शिवीगाळ करीत असल्याची फिर्याद कैलास दादासाहेब मिंड यांनी शहर पोलीस ठाण्यात दिली. त्यानुसार खासगी सावकार भगवान नामदेव मोहिते यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फलटण शहर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक शिंदे तपास करीत आहे.