जिल्ह्यातील साडेतीन लाख
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2021 04:35 AM2021-04-14T04:35:32+5:302021-04-14T04:35:32+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : योग्य नियोजन आणि आरोग्य विभागाची तत्परता यामुळे जिल्ह्यातील कोरोना लसीकरण मोहीम वेगाने सुरू आहे. ...
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : योग्य नियोजन आणि आरोग्य विभागाची तत्परता यामुळे जिल्ह्यातील कोरोना लसीकरण मोहीम वेगाने सुरू आहे. जिल्ह्याला आतापर्यंत सुमारे पावणेचार लाख डोस मिळाले आहेत. यामधून आतापर्यंत ३ लाख ५५ हजार नागरिकांना कोरोनाची लस देण्यात आली आहे. लस उपलब्ध होईल त्याप्रमाणात लसीकरण मोहिमेचा वेग वाढवायचा, असे सूत्र प्रशासनाने ठेवले आहे. तसेच रेमडेसिविरची ५ हजार इंजेक्शन्स लवकरच जिल्ह्याला मिळणार आहेत.
जिल्ह्यात मागील एक वर्षापासून कोरोना विषाणूचे संकट आहे. सुरुवातीच्या दोन महिन्यात कोरोना रुग्णांचे प्रमाण कमी होते. मात्र, जून महिन्याच्या अखेरीपासून बाधितांची संख्या दिवसाला शेकडोच्या घरात स्पष्ट झाली. त्याचबरोबर मृत्युमुखी पडणाऱ्यांचा आकडाही वाढत गेला. लॉकडाऊन असतानाही कोरोनाचा कहर होता. सप्टेंबरअखेरपर्यंत जिल्ह्यात जवळपास ३८ हजारांवर रुग्ण आढळून आले. मात्र, त्यानंतर कोरोना साखळी खंडित झाल्याने बाधितांचे प्रमाण घटले. मात्र, गेल्या अडीच महिन्यांपासून पुन्हा कोरोनाचे रुग्ण वाढू लागले आहेत. मागील काही दिवसांचा विचार करता, मागीलपेक्षा कोरोनाची दुसरी लाट मोठी असल्याचे स्पष्ट होत आहे. या पार्श्वभूमीवर एक दिलासा म्हणजे कोरोना लसीकरण.
जिल्ह्यात जानेवारी महिन्याच्या उत्तरार्धापासून कोरोना लसीकरण सुरू आहे. सुरुवातीला ४५ ते ५९ वर्षांतील कोमॉर्बिड व्यक्ती आणि ६० वर्षांवरील ज्येष्ठांना लस देण्यास सुरुवात झाली. त्यासाठी शासकीय तसेच काही खासगी रुग्णालयातही सोय करण्यात आली. शासकीयमध्ये मोफत, तर खासगी रुग्णालयात शुल्क आकारण्यात आले. मागील काही दिवसांपूर्वी केंद्र शासनाने ४५ वर्षांवरील सर्वांनाच कोरोना लस देण्याचे जाहीर केले. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना लसीकरण मोहीम वेगात सुरू आहे.
जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने तर प्राथमिक आरोग्य केंद्राबरोबरच उपकेंद्रातही लसीकरण मोहीम सुरू केली आहे. त्यामुळे गावपातळीवरील लोकांनाही लस घेता येणे शक्य झाले आहे. या लसीकरणासाठी पूर्ण नियोजन करण्यात आले आहे. ठराविक तारखेलाच उपकेंद्रात लसीकरण होत असल्याने लोकांनाही हेलपाटे घालावे लागत नाहीत. तसेच ग्रामपंचायत, ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका यांचा सहभाग घेतल्याने लसीकरणाचा वेग वाढत चालला आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना लसीचे ३ लाख ७६ हजार ३९० डोस आले आहेत, तर आणखी १९ हजार डोस मिळणार आहेत. जिल्ह्यात सोमवारअखेरपर्यंत ४५ वर्षांवरील ३ लाख ५५ हजार ३७० नागरिकांना कोरोना लस देण्यात आली आहे. जशी लस उपलब्ध होत आहे, त्याप्रमाणात लसीकरणाचा वेगही वाढत आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात जिल्ह्यातील कोरोना लसीकरण ५ लाखावर जाणार आहे.
चौकट :
उद्दिष्टापेक्षा अधिक लसीकरण...
जिल्हा प्रशासनाचे दररोज २० हजार लोकांना लसीकरण करण्याचे उद्दिष्ट आहे. पण, या उद्दिष्टापेक्षा अधिक नागरिकांना लसीकरण करण्यात येत आहे. सोमवारी एका दिवसात तर ३१ हजार ५०५ लोकांना कोरोनाची लस देण्यात आली. आतापर्यंतचा हा उच्चांक आहे.
................................................
आतापर्यंतचे तालुकानिहाय लसीकरण...
जावळी तालुका १५२१२, कऱ्हाड ६४०८१, खंडाळा १८३१४, खटाव तालुका ३१२३६, कोरेगाव २५०४६, महाबळेश्वर १४३९९, माण तालुका १६७०४, पाटण ४०८०३, फलटण ३१३६२, सातारा ७७४२८ आणि वाई तालुका २०७८५.
....................................................................