रंगात रंगले तब्बल साडेतीन हजार विद्यार्थी..!
By Admin | Published: January 29, 2016 12:13 AM2016-01-29T00:13:28+5:302016-01-29T00:29:25+5:30
शाहू स्टेडियमही रोमांचित : खेळातल्या फटकाऱ्यांऐवजी कुंचल्याचे स्ट्रोक अनुभवले
सातारा : येथील जिल्हा क्रीडा संकुल परिसरातील सकाळची वेळ... नेहमीप्रमाणे शांतता कोठेच नव्हती... थंडीतही एक-एक करत मुलं येऊ लागली... पाहता-पाहता मुलांचा किलबिलाट वाढतच गेला... कोवळं ऊन अंगावर घेत मुलं प्रेक्षक गॅलरीत आली अन् सुरू झाली कुंचल्यांच्या स्ट्रोकची स्पर्धा... खेळातील चढउतार, फटकेबाजी पाहणारा क्रीडासंकुलही वेगळ्या अनुभवाने रोमांचित झाला. स्पर्धेत तब्बल साडेतीन हजार विद्यार्थी सहभागी झाले होते.सातारा येथील छत्रपती शाहू क्रीडा संकुलमध्ये रोटरॅक्ट क्लब आॅफ सातारा व युथ कॅम्पसच्या वतीने इंद्रधनुष्य २०१६ या जिल्हास्तरीय चित्रकला स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेत शहरातील विविध शाळांमधील नर्सरी ते आठवीचे सुमारे साडेतीन हजार विद्यार्थी सहभागी झाले होते. येथे येणाऱ्या मुलांबरोबरच पालकांमध्येही दांडगा उत्साह पाहायला मिळत होता. मुलांची नाव नोंदणी करणे, त्यांच्यासाठी कार्डशीट घेऊन देण्यापासून ते ‘कागद असा धर’, ‘उभी रेष मार’, ‘बॉर्डर देण्यास विसरू नको’ आदी सल्ले शेवटपर्यंत पालक देत होते. स्पर्धकांच्या वयाचा व त्यांच्या मानसिकतेचा विचार करून गट पाडून विषय दिले होते. यामध्ये छोट्या गटासाठी मुक्त हस्त चित्र, पहिली व दुसरीच्या विद्यार्थ्यांना केक, फुलपाखरू, आवडते फळ किंवा फूल, ध्वज. तिसरी व चौथीच्या विद्यार्थ्यांना जोकर, निसर्गचित्र, आवडता पक्षी किंवा प्राणी, फुगेवाला. पाचवी व सहावीच्या विद्यार्थ्यांसाठी आवडता सण, आवडता खेळ, बागेत खेळणारी मुलं, माझी शाळा. तर सातवी व आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी वाहतूक साक्षरता, स्वच्छता अभियान, स्त्री भृण हत्या, बालमजुरी, दुष्काळ आदी सामाजिक समस्या हे विषय ठेवले होते. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी रोटरी क्लब सातारा कॅम्पस, कर्मनिष्ठ सामाजिक संघटना, आर्ट आॅफ लिव्हिंग, इनरव्हिल क्लबचे कार्यकर्ते प्रयत्न करत होते. (प्रतिनिधी)
पंधरा विशेष मुले सहभागी
या स्पर्धेत आनंदबन मतिमंद शाळेतील पंधरा विशेष मुले सहभागी झाली होती. त्यांना मुक्तहस्त हा विषय ठेवला होता. त्यांच्यासाठी वेगळे बक्षीस दिले जाणार आहे. यामध्ये साक्षी महामुलकर ही सलग दुसऱ्या वर्षी सहभागी झाली आहे. तिच्या डोळ्यातून पाणी येत असतानाही तिने चित्र रंगवले होते.
रविवारी बक्षीस वितरण
स्पर्धेतील विजेत्यांना रविवार, दि. ३१ रोजी शाहू कला मंदिरमध्ये बक्षीस वितरण करण्यात येणार आहे. प्रत्येक सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र व भेटवस्तूंचे कूपन देण्यात येणार आहे. तसेच व्यासपीठावर चित्रकला व मूर्तिकार यांचे प्रात्यक्षिक दाखविण्यात येणार आहेत.