झाडावरील आंबे चोरीप्रकरणी तिघे ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2021 04:29 AM2021-06-06T04:29:19+5:302021-06-06T04:29:19+5:30
पुसेगाव : पोलिसांसह सर्वच प्रशासन लॉकडाऊन काळात कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी सातत्याने रात्रंदिवस कामात व्यस्त असताना भुरट्या चोऱ्यांना ग्रामीण भागात ...
पुसेगाव : पोलिसांसह सर्वच प्रशासन लॉकडाऊन काळात कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी सातत्याने रात्रंदिवस कामात व्यस्त असताना भुरट्या चोऱ्यांना ग्रामीण भागात ऊत आला आहे. शेतातील उभ्या झाडाचे सुमारे ५ हजार रुपये किमतीचे हापूस आणि केशर जातीचे आंबे पंधरा दिवसांपूर्वी चोरणाऱ्या वर्धनगड येथील तिघांना ताब्यात घेतले.
सातारा-पुसेगाव रस्त्यावर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याची पत्नी नंदा भुजंगराव शिंदे यांच्या आमराईमधून चोरट्यांनी पंधरा दिवसांपूर्वी झाडाचे आंबे चोरून नेले. याबाबत पुसेगाव पोलिसांत तक्रार दाखल झाली. आज पोलिसांनी वर्धनगड येथील तिघांना याप्रकरणी ताब्यात घेतले. सचिन दिलीप घोरपडे, विकास बाळासाहेब सावंत, राज इसार मुल्ला अशी संशयितांची नावे आहेत. त्यांच्याकडून सुमारे तीन हजार रुपयांचे आंबे जप्त केले आहेत. ए. एस. गंबरे तपास करत आहेत.
चोरट्यांनी मंगळवारी (दि. १) रात्री उशिरा शिवारात कोणी नसल्याचा फायदा घेत पुसेगाव येथील बाळकृष्ण लक्ष्मण जाधव यांच्या आटाळी शिवारातील शेतातील सुमारे १५ हजार किमतीचा तुषार संच चोरून नेला. मागील महिन्यात याच शिवारातील दोन शेतकऱ्यांच्या विहिरीतील कृषिपंप आणि साहित्य चोरून चोरटे पसार झाल्याच्या घटना घडल्या आहेत. मागील महिन्यात खटाव येथील युवराज हणमंत शिंदे यांच्या शेतातील बाराशे किलो आले चोरून नेले. पुसेगाव येथील प्रकाश मानसिंग जाधव यांच्या मळवी शिवारातील केशर जातीच्या झाडांचे आंबे चोरी झाले आहेत. तसेच शेतांमधून पाइप्स, बॉल व्हॉल्व्ह व इतर साहित्य चोरी होण्याच्या घटना वारंवार घडत असल्याचे शेतकरी सांगत आहेत.