बोरगाव - दह्याट मुख्य रस्त्यावरील तीन पूल गेले!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2021 04:32 AM2021-07-25T04:32:18+5:302021-07-25T04:32:18+5:30
वाई : वाईच्या पश्चिम भागात गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. वाईच्या पश्चिम भागात अतिवृष्टीमुळे बोरगाव - दह्याट ...
वाई : वाईच्या पश्चिम भागात गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. वाईच्या पश्चिम भागात अतिवृष्टीमुळे बोरगाव - दह्याट मुख्य रस्त्यावरील तीन पूल वाहून गेल्याने पंधरा गावांचा दोन दिवसांपासून संपर्क तुटला आहे. जोर येथे भूस्खलन होऊन तीन घरांवर रेती गेल्याने दोन घरे गाडली गेली आहेत. जोर रस्त्यावरील तीन पूल वाहून गेल्याने गावात अद्याप कोणत्याही प्रकारची मदत मिळालेली नाही. प्रशासनाने लवकर दाखल होऊन दळणवळण सुरू करावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
गेल्या काही दिवसांपासून भात लागणीसाठी पावसाच्या प्रतीक्षेत असणारा शेतकरी सुखावला असला तरी मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी शेतीचे व पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
दोन दिवसात झालेल्या अतिवृष्टीमुळे जोर, जांभळी खोऱ्यात अनेक ठिकाणी शेताचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. भूस्खलन झाल्याने मौजे बलकवडी (ता. वाई) व नांदगणे फणसेवाडी यांना जोडणारा पूल तुटल्याने दोन गावांचा संपर्क तुटला आहे. तसेच अनेक ठिकाणी शेतकऱ्यांच्या भाताच्या ताली, बांध, भाताची रोपे वाहून गेल्याने लाखोंचे नुकसान झाले आहे. वाईच्या पश्चिम भागात अतिवृष्टीमुळे बोरगाव - दह्याट मुख्य रस्त्यावरील तीन पूल वाहून गेल्याने पंधरा गावांचा दोन दिवसांपासून संपर्क तुटला आहे.
दरम्यान, आमदार मकरंद पाटील, तहसीलदार रणजित भोसले, पोलीस निरीक्षक आनंदराव खोबरे, गटविकास अधिकारी उदयकुमार कुसूरकर, उपसभापती विक्रांत डोंगरे, ज्ञानदेव सणस, युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष विराज शिंदे, प्रमोद अनपट, आरपीआय जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड, स्वप्नील गायकवाड, श्रीकांत निकाळजे यांनी नुकसानग्रस्त भागाला भेट देऊन मदत कार्याला गती दिली.
चौकट...
दळणवळण सुरू करण्याची मागणी...
जोर येथे भूस्खलन होऊन तीन घरांवर वाळू आल्याने दोन घरे गाडली गेली आहेत. यामध्ये मायलेक वाहून गेले आहेत. जोरच्या रस्त्यावरील तीन पूल वाहून गेल्याने जोर गावात अद्याप कोणत्याही प्रकारची मदत मिळालेली नाही. त्यामुळे प्रशासनाने लवकर याठिकाणी दाखल होऊन दळणवळण सुरू करावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.