युवकाच्या खुनाचा प्रयत्नप्रकरणी तिघांना शिक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2019 03:21 PM2019-12-02T15:21:33+5:302019-12-02T15:22:28+5:30
उसने पैसे मागितल्यामुळे कुऱ्हाडीने वार करून सागर संपत मोरे (वय ३१, रा. पंचशीलनगर, खेड-नांदगिरी, ता. कोरेगाव) या युवकाच्या खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी जिल्हा न्यायाधीश एन. एल. मोरे यांनी तिघांना वेगवेगळी शिक्षा सुनावली.
सातारा : उसने पैसे मागितल्यामुळे कुऱ्हाडीने वार करून सागर संपत मोरे (वय ३१, रा. पंचशीलनगर, खेड-नांदगिरी, ता. कोरेगाव) या युवकाच्या खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी जिल्हा न्यायाधीश एन. एल. मोरे यांनी तिघांना वेगवेगळी शिक्षा सुनावली.
सोन्या उर्फ आकाश अविनाश मोरे (वय २३) याला तीन वर्षे सक्तमजुरी व दोन हजार रुपये दंड तर अविनाश भैरू मोरे (वय ५५), विश्वास भैरू मोरे (वय ६१, सर्व रा. पंचशीलनगर खेड- नांदगिरी, ता. कोरेगाव) यांना दोन महिने सक्तमजुरी व प्रत्येकी पाचशे रुपये दंड, अशी शिक्षा सुनावण्यात आली आहे.
या खटल्याची थोडक्यात पार्श्वभूमी अशी, फियार्दी प्रल्हाद बाजीराव मोरे (वय ६०), सागर संपत मोरे (वय ३१, दोघेही रा. पंचशीलनगर, खेड-नांदगिरी ता. कोरेगाव) हे १५ एप्रिल २०१८ रोजी रात्री सव्वा दहा वाजता सोन्या ऊर्फ आकाश मोरे यास उसने दिलेले पैसे मागण्यासाठी गेले होते. त्याचा राग मनात धरून तिघांनी संगनमताने सागर मोरे याच्या डोळ्यात मिर्ची पुड टाकली. अविनाश मोरे, विश्वास मोरे यांनी सागरला शिवीगाळ, दमदाटी करून हातातील लाकडी दांडक्याने मारहाण केली.
यावेळी सोन्या मोरे याने सागर याचा खून करण्याच्या उद्देशाने कुऱ्हाडीने छातीवर एक व पाठीवर दोन वार करून त्याला गंभीर जखमी केले होते. या प्रकरणी कोरेगाव पोलीस ठाण्यात तिघांवर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल झाला होता. तत्कालिन पोलीस उपनिरीक्षक डी. डी. चौगुले यांनी या प्रकरणाचा तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.
न्यायालयापुढे आलेले पुरावे आणि साक्षीदार ग्राह्य मानून न्यायालयाने सोन्या उर्फ आकाश मोरे याला तीन वर्षे सक्तमजुरी तर अविनाश मोरे आणि विश्वास मोरेला दोन महिन्याची शिक्षा सुनावली. सहायक जिल्हा सरकारी वकील एन. डी. मुके यांनी सरकार पक्षातर्फे काम पाहिले. पोलिस प्रॉसिक्यूशन स्कॉडचे हवालदार धनंजय दळवी व त्यांच्या टीमने त्यांना सहकार्य केले.