कोरोना संशयित तीन युवकांना शासकीय रुग्णालयातील विलगीकरण कक्षात केले दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2020 09:35 AM2020-03-22T09:35:40+5:302020-03-22T09:35:44+5:30
चिली येथून आलेल्या २४ वर्षीय युवकास व रात्री १० वा. दुबई येथून आलेल्या २९ वर्षीय युवकास दाखल करण्यात आले आहे.
सातारा : बहामा, दक्षिण अमेरिका व्हाया सातारा येथे आलेला २७ वर्षीय युवक व काही वेळ त्याच्या सोबत असलेला त्याचा मित्र वय २४ वर्षे त्या दोघांनाही सर्दी व खोकला असल्याने दि. २१ मार्च रोजी रात्री ११ वा. जिल्हा रुग्णालयातील विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले. तसेच कतार येथून प्रवास करुन आलेला २४ वर्षीय युवक त्याला घसा खवखवत असल्याने आरोग्य कर्मचाऱ्यांनी त्याला रात्री १ वा. विलगीकरण कक्षात दाखल केले.
यापूर्वी शनिवारी दुपारी १२ वा. चिली येथून आलेल्या २४ वर्षीय युवकास व रात्री १० वा. दुबई येथून आलेल्या २९ वर्षीय युवकास दाखल करण्यात आले आहे. असे एकूण शनिवार अखेर रात्री उशिरा पर्यंत सातारा जिल्ह्यात एकूण पाच रुग्ण विलगीकरण कक्षात दाखल झाले आहे.
वरील पाचही रुग्णांच्या घशातील स्त्रावांचे नमुने पुण्यात एन.आय.व्ही. कडे पाठविण्यात आले असून त्यांना कोरोना संशयित लक्षणे असल्याने त्यांना सध्या विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. प्राथमिक तपासणीनंतर त्यांची प्रकृती स्थिर आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे.
तथापी कोणीही घाबरून जावू नये, जिल्हा प्रशासन पूर्णपणे दक्ष आहे. हा संसर्ग रोखण्यासाठी नागरिकांनी जिल्हा प्रशासानाला मदत करावी तसेच वेळोवेळी प्रशासनाकडून काढण्यात आलेल्या आदेशाचे नागरिकांनी तंतोतंत पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केले आहे.