सातारा जिल्ह्यातून तिघे गुन्हेगार हद्दपार, दोन वर्षांसाठी बंदी; पोलिस अधीक्षकांची कारवाई
By दत्ता यादव | Published: April 5, 2023 07:28 PM2023-04-05T19:28:51+5:302023-04-05T19:29:11+5:30
गुन्हेगारांना पोलिसांकडून इशारा...
सातारा : शहरात गर्दी मारामारी, दुखापत, शिवीगाळ, दमदाटी, जबरी चोरी, घरात घुसून दुखापत करणे आदी गुन्हे दाखल असणाऱ्या तिघांना सातारा जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी हद्दपार करण्यात आले आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी केली आहे.
साैरभ उर्फ लाल्या नितीन सपकाळ (वय २३, रा. रघुनाथपुरा पेठ, करंजे सातारा), ओंकार रमेश इंगवले (२७, रा. देशमुख काॅलनी, करंजे पेठ, सातारा), मंदार हणमंत चांदणे (३२, रा. गुरुवार पेठ, सातारा) अशी हद्दपार करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, या तिघांकडून समाजात उपद्रव होत होता. त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करूनही त्यांच्यामध्ये कसलीही सुधारणा होत नव्हती. त्यांच्या कृत्यांमुळे सर्वसामान्य नागरिकांचे फार मोठे आर्थिक व शारीरिक नुकसान झाले आहे. जनतेमधून त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी होत होती.
सातारा शहर पोलिस ठाण्यातील पोलिस निरीक्षक भगवान निंबाळकर यांनी या तिघांवर असलेल्या गुन्ह्यांचा प्रस्ताव पोलिस अधीक्षक समीर शेख यांच्याकडे पाठविला होता. या प्रस्तावावर सुनावणी झाल्यानंतर अधीक्षकांनी या तिघांनाही सातारा जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी हद्दपार केले.
सरकार पक्षाच्या वतीने अपर पोलिस अधीक्षक बापू बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अरुण देवकर, पोलिस उपनिरीक्षक मधुकर गुरव, पोलिस नाइक प्रमोद सावंत, केतन शिंदे, अनुराधा सणस यांनी योग्य पुरावे सादर केल्याने संशयितांवर कारवाई झाली.
गुन्हेगारांना पोलिसांकडून इशारा...
नोव्हेंबर २०२२ पासून सहा टोळ्यांमधील १६ व्यक्तींना तडीपार करण्यात आले आहे. भविष्यातही सातारा जिल्ह्यामधील सराईत गुन्हेगारांच्याविरुद्ध हद्दपारी, मोक्का, एमपीडीए अशा प्रकारच्या कडक कारवाया करण्यात येणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिली आहे.