एसटी-पिकअप धडकेत तीन गंभीर
By admin | Published: February 19, 2015 10:03 PM2015-02-19T22:03:25+5:302015-02-19T23:47:28+5:30
सात किरकोळ जखमी : राजापुरीजवळील तीव्र वळणावर दुर्घटना
परळी : सातारा-ठोसेघर रस्त्यावर साताऱ्यापासून १८ किलोमीटर अंतरावरील राजापुरी फाट्याजवळ एसटी बस आणि पिकअप गाडीच्या (छोटा हत्ती) जोरदार धडक होऊन दहा जण जखमी झाले. त्यातील तीन जण गंभीर असून, सात जणांना किरकोळ जखमा झाल्या आहेत. गुरुवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास हा अपघात झाला.याबाबत अधिक माहिती अशी, वावदरेकडून साताऱ्याकडे निघालेली एसटी बस (एमएच २० डीएल १३६६) राजापुरी फाट्यानजीक बोलांगणी नावाच्या रानाजवळ आली. त्याच वेळी रेवंडे, कुस बुद्रुक, परमाळे आणि राजापुरी गावांतील प्रवाशांना घेऊन निघालेली पिकअप गाडी (एमएच ०४ जीयू ६१२६) समोरून येत होती. तीव्र वळणावर अंदाज न आल्याने दोन्ही वाहनांची समोरासमोर भीषण धडक झाली. धडकेनंतर एसटी बस झाडावर जाऊन आदळली तर पिकअप उलटून पडली.या अपघातात विठाभाई आत्माराम लोटेकर (वय ६०, रा. कुस बुद्रुक, ता. सातारा), आबाजी धोंडिबा भोसले (वय ६०), सीमा बाबुराव भोसले (वय ३५), सारिका भोसले (वय ३०, तिघे रा. रेवंडे, ता. सातारा), चंद्रभागा कदम (वय ५७), हणमंत कदम (वय ६२), संदीप कदम (वय ३५, तिघे रा. परमाळे, ता. सातारा)धोंडिराम गंगाराम साळुंखे (वय ६२), परशुराम श्रीपती साळुंखे (वय ५५), इंदुमती हणमंत साळुंखे (वय ४७, तिघे रा. राजापुरी, ता. सातारा) असे दहा जण जखमी झाले. यातील विठाबाई लोटेकर, आबाजी भोसले आणि चंद्रभागा कदम या तिघांची प्रकृती चिंताजनक आहे. सर्व जखमींना जिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. अपघाताची नोंद करण्याचे काम सातारा तालुका पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत सुरू होते. (वार्ताहर)
देवदर्शनाहून परतताना अपघात
आबाजी धोंडिबा भोसले यांचा मुलगा मनीष यांचा चार दिवसांपूर्वी विवाह झाला. त्यांचे कुलदैवत असणाऱ्या निवकुणे (ता. पाटण) येथे देवदर्शनासाठी घरातील सर्वजण पिकअप व्हॅनमधून गेले होते. गावी परतताना झालेल्या या भीषण अपघातात नवरदेव मनीष यांना किरकोळ जखमा झाल्या, तर आबाजी भोसले गंभीर जखमी झाले. इतर जखमी एसटीमधील प्रवासी आहेत. दोन्ही वाहनांच्या चालकांना दुखापत झाली नाही.