भरदिवसा तीन फ्लॅट फोडले!

By admin | Published: October 17, 2016 12:33 AM2016-10-17T00:33:12+5:302016-10-17T00:33:12+5:30

आगाशिवनगरमध्ये चोरी : साठ हजारांवर रोकड लंपास

Three days after the blast | भरदिवसा तीन फ्लॅट फोडले!

भरदिवसा तीन फ्लॅट फोडले!

Next

मलकापूर : कटावणीच्या साह्याने कोयंडे तोडून अज्ञात चोरट्यांनी भरदिवसा तीन फ्लॅटमधून सुमारे ६२ हजारांहून अधिक रोखड लंपास केली. आगाशिवनगर येथील बालाजी पार्क या इमारतीत गुरुवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, येथील बालाजी कॉलनीमध्ये ‘बालाजी पार्क’ ही इमारत आहे. या इमारतीच्या बी २ फ्लॅटमध्ये हेमंत धोंडिराम घारे हे नऊ वर्षांपासून कुटुंबासह वास्तव्यास आहेत. गुरुवारी हेमंत हे कामासाठी बाहेर गेले होते. मुलेही शाळेत गेली असल्याने हेमंतच्या पत्नी खरेदीसाठी कऱ्हाड शहरात गेल्या होत्या. कऱ्हाडमधील कामे आटोपून त्या दुपारी एक वाजता परत घरी आल्या. खरेदी केलेले साहित्य घरात ठेवून त्यांनी घराला कुलूप लावले व थोडावेळ शेजारच्या फ्लॅटमध्ये जाऊन बसल्या. अर्ध्या तासाने त्या बाहेर आल्या असता त्यांच्या दाराचा कोयंडा तुटून कुलूप खाली पडल्याचे निदर्शनास आले. दार उघडे असल्याने घरात चोरी झाल्याची त्यांची खात्री झाली. याबाबत त्यांनी पती हेमंत यांच्यासह शेजाऱ्यांना माहिती दिली. तसेच घरात जाऊन पाहिले असता टेबलचे ड्राव्हर, कपाटाचे दार कटावणीच्या साह्याने उचकटून पर्स, कपाटातील व कपड्यात ठेवलेले सुमारे ५० हजार ६०० रुपये रोख रक्कम चोरट्यांनी लंपास केल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.
याच इमारतीच्या वरच्या मजल्यावर विठ्ठल घाडगे कुटुंबासह राहतात. ते नोकरी निमित्ताने सकाळीच बाहेर गेले होते. त्यांच्याही फ्लॅटमधून चोरट्यांनी १२ हजार रोख रक्कम लंपास केली. तर घाडगे यांच्या शेजारीच दुर्गेश चव्हाण यांचा फ्लॅट आहे. त्या फ्लॅटमध्ये चोरट्यांनी चोरी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, तेथे कोणीही वास्तव्यास नसल्याने चोरट्यांना रिकाम्या हाताने परतावे लागले. अज्ञात चोरट्यांनी भर दिवसा बंद फ्लॅट फोडून सुमारे ६२ हजार ६०० रुपये रोख रक्कम लंपास केल्याने परिसरात भीतीचे वातावरण आहे.
घटनेबाबत संबंधित कुटुंबानी तातडीने कऱ्हाड शहर पोलिसांना खबर दिली. एका पोलिस कर्मचाऱ्याने घटनास्थळी येऊन पाहणी केली. मात्र, चोरीच्या घटनेची नोंद रविवारी दुपारपर्यंत पोलिसांत झाली नव्हती.
पोलिसांकडून चालढकल!
मलकापूरसह परिसरातून चोरीच्या घटना घडण्याची मालिकाच सुरू आहे. लहान-लहान चोरीच्या घटना पोलिसांचा ससेमिरा नको म्हणून नागरिक पोलिसांत नोंदवत नाहीत. आगाशिवनगरात दिग्विजय प्लाझामधील चोरीचे काय झाले, हे आजपर्यंत माहीत नाही. तर बालाजी पार्कमध्ये गुरुवारी झालेल्या चोरीची रविवारपर्यंत नोंद होत नाही. यावरून अशा घटनांबाबत पोलिस चालढकल करत असल्याची नागरिकांमध्ये चर्चा आहे.
 

Web Title: Three days after the blast

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.